सावंतवाडी-मळगाव रोड रेल्वे स्टेशनचे टर्मिनसमध्ये रूपांतर करण्यासाठी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत असून, त्याचे उद्घाटन येत्या १७ जूनला होण्याची शक्यता आहे. मात्र सावंतवाडी स्टेशनवर रेल्वे गाडय़ात पाणी भरण्याची सुविधा निर्माण होईपर्यंत टर्मिनसचा दर्जा मिळणे कठीण असल्याचे जाणकार सांगत आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात पाणी योजना घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. सावंतवाडी टर्मिनस सावंतवाडी की मदुऱ्याला होणार याबाबत राजकीय वाद निर्माण झाले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मडुरा तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी स्टेशन टर्मिनससाठी योग्य असल्याचे जाहीर करून राजकीय वाद निर्माण केले होते. सिंधुदुर्गचे सुपुत्र सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री झाल्यानंतर कोकण रेल्वेला आशादायक चित्र उभे राहिले आहे. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीला यश आले. पहिल्या टप्प्याचे टर्मिनसचे काम पूर्ण होत आहे. त्याचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते १७ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

सावंतवाडी टर्मिनसचा दुसरा टप्पा जाहीर करून काम आता हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे गाडय़ात चिपळूण, रत्नागिरी येथे पाणी भरण्याची सुविधा आहे. रत्नागिरीत पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सावंतवाडीत पाणी भरण्याची सुविधा निर्माण झाली तर सर्व रेल्वे गाडय़ा या ठिकाणी थांबतील असे जाणकार सांगतात.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मणेरी-बांदा-रेडी-वेंगुर्ले अशा मार्गाने जाणाऱ्या नळपाणी योजनेला इन्सुली-मळगाव मार्गाने अतिरिक्त मार्ग करून पाणी देण्याची योजना असल्याचे म्हटले आहे; पण ही योजना केव्हा पूर्ण होईल त्याचा थांगपत्ता नाही, असे बोलले जात आहे. सावंतवाडी-मळगाव रोड रेल्वे टर्मिनसच्या ठिकाणी पाणथळ भाग असल्याने दोन स्वतंत्र विहिरी रेल्वेने खोदल्यास पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेचा स्वत:चा प्रकल्प कायमस्वरूपी निर्माण होईल, अशी चर्चा जाणकारात आहे. हा प्रस्ताव भाजपच्या वतीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

Story img Loader