सुमारे शंभर वर्ष वयाच्या पण नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात ‘सह्याद्री देवराई’ संस्थेला यश आले आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन राहावे म्हणून सोमवारी (दि १४) दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत म्हसवे (ता. सातारा) येथे या वटवृक्षासोबत अनोखा व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती अभिनेते व संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी दिली.
श्रीगोंदा येथील पानसरे नर्सरीचे संचालक बाळासाहेब पानसरे यांनी या वटवृक्षाच्या पुनर्रोपणाच्या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन केले. तर पुनर्रोपणाबाबत अधिक माहिती देताना अभिनेते व संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, “अडचण होत आहे असे समजून नकोसा झालेला वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून साताऱ्याला गोळीबार मैदान, म्हसवे येथे याचे पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे. व्हॅलेंटाइन डे’ला आम्ही सर्व वृक्षप्रेमी नागरिक, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षाभोवती जमून त्याचे कोडकौतुक करणार आहोत”.
ते पुढे म्हणाले, “वड हा राष्ट्रीय वृक्ष असून त्याचे सन्मानाने दि २६ जानेवारी रोजी म्हसवे (ता सातारा)येथे पुनर्रोपण करण्यात आले. निवडणुकीत जिंकला तरी एखाद्याची आपण मिरवणूक काढतो, इथे तर शंभर वर्षाचा राष्ट्रीय वृक्ष वाचला आहे. म्हणून त्याच्या पालवीसोबत गाणी गायली जाणार आहेत, नृत्य केले जाणार आहे.
संस्थेचे विश्वस्त धनंजय शेडबाळे म्हणाले, “वडासारख्या मोठया झाडांना वाचवता येते, जीवदान देता येते, हीच जनजागृती आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून व्हॅलेंटाइन डे अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.”