Sayaji Shinde Video Viral: महायुतीमध्ये जागावाटप आणि इतर काही विषयांवरून धुसफूस निर्माण झालेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा करणार असल्याची अफवा शुक्रवारी पसरली होती. मात्र घडलं भलतंच. सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजविणारे अभिनेते सयाजी शिंदे यांचा पक्षप्रवेश झाला. सामाजिक भान जपणाऱ्या कलाकारांमध्ये सयाजी शिंदे यांचा उल्लेख होतो. त्यांनी राजकारणात आणि तेही अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सयाजी शिंदे यांनी अनेकवेळा राजकीय भाष्य करत व्हिडीओ तयार केले होते. यापैकी एक व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सत्तेला धरा तिच विचारधारा’

२०१९ नंतर राज्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. २०२२ आणि २०२३ रोजी अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. सत्तेच्या भोवती फिरणाऱ्या राजकारणावर अनेक कलाकारांनी विविध माध्यमातून भाष्य केले. सयाजी शिंदे यांनीही रिलच्या माध्यमातून यावर विनोद केला होता. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यापासून ते महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्ते, हितचिंतकांनी आता सयाजी शिंदे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करून त्यांच्यावर टीका केली आहे.

हे वाचा >> Sayaji Shinde : अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच का प्रवेश केला? सयाजी शिंदे म्हणाले, “मला या पक्षाची स्ट्रॅटेजी…”

सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिले, “तुमच्या असंख्य कलाकृतीचे आम्ही फॅन होतो पण… पण… गुलिगत धोका दिला राव तूम्ही..!!!”

एक्सवरील गजाभाऊ नावाच्या हँडलवरूनही हाच व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सयाजी शिंदे यांनी व्हिडीओत म्हटलेला संवाद कॅप्शनमध्ये देण्यात आला आहे.

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २०१९ च्या सत्तांतराच्या नाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. या वेबसिरीजमध्ये सयाजी शिंदे यांचीही महत्त्वाची भूमिका होती. राज्यातील सत्तासंघर्षावर विनोदी अंगाने भाष्य या सीरीजमध्ये करण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी सयाजी शिंदे यांचा ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातही राजकारणावरील उपहासात्मक विनोद दाखविला गेला होता. याही चित्रपटावरून सयाजी शिंदे यांचे मिम्स बनत आहेत.

एका एक्स युजरनं ‘पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा’ अशा शीर्षकाखाली एक मीम शेअर केलं आहे. ज्यामध्ये सयाजी शिंदे आणि अजित पवार यांचे फोट दाखवले आहेत.

पक्षप्रवेशानंतर सयाजी शिंदे काय म्हणाले?

“मी अजून नेता झालेलो नाही. त्यामुळे मला अजून एवढं बोलता येत नाही. मी चित्रपटात नेत्यांच्या, गृहमंत्र्यांच्या भूमिका केलेल्या आहेत. खलनायकाच्याही भूमिका केल्या. मी राजकारणात कधी येईल, असं मला वाटलंच नव्हतं. गेल्या १० वर्षांपासून मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. या कामाची सुरुवात माझ्या आईमुळे झाली होती. मी ठरवलं होतं की, माझ्या आईच्या वजनाएवढ्या झाडाच्या बिया लावेन आणि पर्यावरणाचं चांगलं काम करेन. हे काम करत असताना काही अडचणी आल्या की मंत्रालयात जावं लागायचं. समजा मी जर २५ वेळा मंत्रालयात गेलो असेल तर त्यापैकी १५ वेळा अजित पवारांना भेटलो. ज्या-ज्या वेळी मी अजित पवारांना भेटलो तेव्हा एक घाव दोन तुकड्यासारखं काम त्यांनी केलं. ते लगेच तातडीने निर्णय घेतात. त्यामुळे मला देखील खूप फायदा झाला. त्यांना भेटल्यामुळे पटकन कामे झाली. त्यामुळे मला त्यांच्याबाबत कायम आदर आहे”, असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sayaji shinde old video viral after he joins ncp ajit pawar faction kvg