बीड शहरानजीक असलेल्या पालवन परिसरातील तब्बल शंभर एकर डोंगरावर अभिनेते सयाजी शिंदे आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सह्याद्री देवराईला रविवारी लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालं. यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे यांनी हात जोडून सर्वांना अशाप्रकारचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती केलीय.
राज्यभरामध्ये तुम्ही सह्याद्री वनराईच्या माध्यमातून वृक्ष चळवळ सुरु केलीय. एकीकडे तुम्ही हे काम करत असताना दुसरीकडे सातत्याने सह्याद्री वनराईचं नुकसान केलं जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “प्रयत्न करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. ही एवढी मोठी जागा असते त्यात चुकून कोणीतरी आग लावतो. त्यांना हात जोडून विनंती आहे की असं करु नका. यामुळे संपूर्ण मानवजातीचं नुकसान होत आहे. शासनाने, ग्रामपंचायतीने आणि सर्वसामान्यांनीही प्रयत्न केले पाहिजेत. हे असं नुकसान होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे,” असं म्हटलं.
नक्की वाचा >> सयाजी शिंदे आदित्य ठाकरेंची घेणार भेट; म्हणाले, “या महिन्याभरात त्यांची भेट घेऊन…”
पुढे बोलताना सयाजी शिंदेंनी वृक्षरोपणाचे फायदे सांगितले. “आपण सह्याद्री वनराईचं जे काम करतोय हे सारं आनंदासाठी करतोय. नम्र व्हावं कोणापुढे तर ते झाडापुढं व्हावं याच हेतूने आपण सर्वजण काम करतोय. आपण पैसा मिळवून बघतो, गाड्या घेऊन बघतो. पण शेवटी उपयोगाला कोण येतं तर ऑक्सिजन. उपयोगाला कोण येतं तर झाडं आणि त्याने दिलेलं अन्न. जगात कोणीही कोट्याधीश असला तरी तो अन्न तयार करतो का? ती जादू फक्त झाडालाच येते. म्हणून आपण झाडांशी नम्र राहिलं पाहिजे,” असं सयाजी शिंदे म्हणालेत.
चार वर्षांपूर्वी उभारणी केलेल्या बीड शहरानजीकच्या सह्याद्री देवराईला आग लागल्याची घटना नुसकतीच घडली होती. ५ ते ६ एकर परिसरात रविवारी पहाटे लागलेल्या आगीमध्ये हजारो झाडे जळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळे येथे सह्याद्री देवराई लोकार्पण सोहळा आज अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सयाजी शिंदेंनी आरे कॉलनी व नॅशनल पार्क येथे सह्याद्री देवराई उभारण्यासाठी आदित्य ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती दिली.