सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपळे येथे सह्याद्री देवराई लोकार्पण सोहळा आज अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सयाजी शिंदेंनी आरे कॉलनी व नॅशनल पार्क येथे सह्याद्री देवराई उभारण्यासाठी आदित्य ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती दिली.
“वृक्षारोपणाला पैशाची गरज लागत नाही तर इच्छेची गरज लागते,” असं सांगताना सयाजी शिंदेंनी मुंबईमध्येही हा प्रकल्प राबवण्याची इच्छा व्यक्त केली. “आरे कॉलनी व नॅशनल पार्क मध्ये देवराई उभी करावयाची आहे यासाठी या महिन्याभरात आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत त्यांना विनंती करणार आहे की यासंदर्भात आम्हाला परवानगी द्या,” असं सयाजी शिंदे म्हणाले.
सह्याद्री गेवराईच्या सततच्या नुकसानाबद्दलही त्यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात एक विनंती केली. “प्रयत्न करणे सगळ्यांची जबाबदारी आहे. ही एवढी मोठी जागा असताना कुणीतरी आग लावतो त्यांना हात जोडून विनंती करतो की अस करू नका यात सर्व मानव जातीचे नुकसान आहे. यासाठी शासनाने, ग्रामपंचायतीने, सामान्य माणसाने प्रयत्न करावे. असे नुकसान होता कामा नये,” असंही सयाजी शिंदे म्हणाले.
बीड शहरानजीक असलेल्या पालवन परिसरातील तब्बल शंभर एकर डोंगरावर सयाजी शिंदे आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने चार वर्षांपूर्वी उभारणी केलेल्या सह्याद्री देवराईला आग लागल्याची घटना नुसकतीच घडली होती. ५ ते ६ एकर परिसरात रविवारी पहाटे लागलेल्या आगीमध्ये हजारो झाडे जळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.