अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील फोफसंडी भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या शिवकालीन टाक्या उभारणीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमुळे उघड झाले आहे. योजनेत ९ शिवकालीन टाक्या उभारण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवले गेले आहे. प्रत्यक्षात हे काम अपुर्ण आहे. मात्र मंजुर ७४ लाख १२ हजार रु. पैकी ७३ लाख ७५ हजार रु. खर्च झाल्याचे दाखवले गेले आहे.
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सहसचिव डॉ. अजित नवले यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीमध्ये या भ्रष्टाचारावर प्रकाश पडला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व मार्क्‍सवादी किसान सभेने केली आहे. या मागणीचे निवेदन पक्ष व संघटनेने जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, लघुपाटबंधारेचे उपअभियंता यांना दिले आहे. मात्र त्याची दखल न घेतल्याने पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
फोफसंडी या अतिदुर्गम भागात सध्याही तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल डोंगरदऱ्याच्या निसरडय़ा व जीवघेण्या वाटा तुडवाव्या लागतात. या पाश्र्वभूमीवर सिवकालीन टाक्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. फोपशंडी परिसरातील घोडेवाडी गटोळी, पिचडवाडी, मुढेवाडी, मेमाणेवस्ती नासका आंबा, गावठाण, जांभळेवाडी व कोंडारवाडी येथे ९ शिवकालीन टाक्या मंजुर करण्यात आल्या. त्यासाठी ७४ लाख १२ हजार रु. मंजुर करण्यात आले. ही कामे पुर्ण झाल्याची खोटी मोजमापे दाखवून, काही टाक्यांच्या जागा मनमानी पद्धतीने बदलून, वनजमिनीत अतिक्रमणे करुन बांधण्यात आली. मंजूर निधीतील ७३ लाख ७५ हजार  रु. काढून घेण्यात आले आहेत. काही टाक्यांवर मंजुर निधीपेक्षा जादा खर्च झाल्याचे दाखवूनही अतिरिक्त रक्कम परस्पर काढून घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे निवेदन देऊनही ठेकेदार, अधिकारी व सत्ताधारी यांच्यातील लागेबांध्यामुळे चौकशी होत नसल्याचा आरोप नवले यांनी केला आहे. देवठाण येथील रोहयोच्या कामातील भ्रष्टाचार अशाच पद्धतीने सुरुवातीला दडपण्याचा प्रयत्न झाला होता. माकपचे शिष्टमंडळ डॉ. अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यानंतर चौकशीचे आदेश व कार्यवाही झाली. फोपसंडी येथील टाक्यांच्या कामातील भ्रष्टाचाराचे प्रकरण  दडपण्याचे प्रयत्न आहेत, त्यामुळे पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे निवेदनात नवले यांनी नमूद केले आहे.

Story img Loader