शिष्यवृत्ती परीक्षेला आजच्या स्पध्रेच्या युगात अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच शिष्यवृत्ती परीक्षेला स्पर्धापरीक्षा म्हणून ओळखले जाते. अशा या परीक्षेला शासनदरबारी मात्र महत्त्व नसल्याचेच दिसून येते. अन्यथा दीड वर्षांपूर्वी उत्तीर्ण झालेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यापासून वंचित राहावे लागले नसते, अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, ही शिष्यवृत्ती संबंधित विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आणखी दीड-दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षांत घेतलेल्या परीक्षेत राज्यातील २० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते.
त्यापकी काहींच्या शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने त्यांना ती मिळाली. मात्र ज्यांची बँक खाती नाहीत, तसेच अन्य काही कारणांमुळे राज्यातील १३ हजार विद्यार्थ्यांना आजतागायत शिष्यवृत्ती मिळालेली नाही याबाबत माहिती घेता असे सांगण्यात आले की, चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी पाचवीसाठी अन्य शाळांत प्रवेश घेतात. त्यामुळे बँक खात्याचा क्रमांक देताना अडचणी येतात व शिष्यवृत्तीच्या पूर्ततेत काही त्रुटी राहून जातात. तसेच काही शाळांचे मुख्याध्यापक याबाबत गांभीर्याने लक्ष देत नाहीत व त्याचा फटका शिष्यवृत्तिपात्र विद्यार्थ्यांना बसतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या वर्षी पूर्व माध्यमिक (चौथी) परीक्षेचा रत्नागिरी जिल्ह्य़ाचा निकाल ५८.०३ टक्के तर माध्यमिक शिष्यवृत्ती (सातवी) चा निकाल ४९.११ टक्के लागला होता. चौथीत १७,२८१ पकी १० हजार १२५, तर सातवीत ११,११५ पकी ५,४५९ विद्यार्थी पात्र ठरले होते. यापकी काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे उघड झाले आहे. त्यातच शिष्यवृत्तीची रक्कम अगदीच तुटपुंजी. ती वाढविण्याबाबत शासनाकडून कसलीही हालचाल होत नाही. परंतु सध्या असलेली शिष्यवृत्तीची रक्कम तरी संबंधित विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळावी, यासाठी तरी शासनाने लक्ष द्यावे, अशी पालकांची अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा