शनिवारी रात्री दीडच्या सुमारास समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसने पेट घेतल्यामुळे २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना ताजी असताना नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बस आणि स्कूल बसचा विचित्र अपघात झाला आहे. स्कूल बसमधून अनेक लहान मुलं प्रवास करत होती. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही.
नाशिक-पुणे महामार्गावर चंदनपुरे येथे एसटी महामंडळाची शिवशाही बस आणि स्कूल बसचा अपघात झाला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बसचा पत्रा उडून स्कूल बसवर आदळला. यामुळे मोठा अपघात होता होता राहिला आहे. विशेष म्हणजे अपघातावेळी स्कूल बसमध्ये अनेक लहान मुलं प्रवास करत होते. या घटनेची अधिक चौकशी महामार्ग पोलीस करत आहेत.
दुसरीकडे, अकोटहून पुण्याकडे जाणाऱ्या आणखी एका खासगी लक्झरी बसला शेगांव मार्गावरील हनवाडी फाट्यानजीक अपघात झाला आहे. ही बस घटनास्थळी उलटी झाली आहे. या दुर्घटनेत काही प्रवाशी जखमी झाले असून त्यांना अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात घडतात.