नांदेड : अर्धापूर शहरातील तामसा रस्त्यावरील नरहरी स्वयंवर मंगल कार्यालयाच्या परिसरात स्कूल बस व मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोचा शनिवारी (दि.8) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघातात स्कूल बसमधील अकरा विद्यार्थी जखमी झाले. त्यातील चार विद्यार्थ्यांसह चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त कळताच पालकांनी घटनास्थळी व ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. स्कुल बसमध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर, पाणी बॅटल, बुट अस्ताव्यस्त पडलेले होते.
अर्धापूर शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी शाळा सुटल्यावर स्कूल मधुन आपआपल्या गावी परत जात होते. मंगल कार्यालयाच्या परिसरात समोरून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोचा व स्कूलबसचा अपघात झाला. या अपघातात 11 विद्यार्थी जखमी झाले आहेत तर चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.जखमी विद्यार्थी युवराज अमोल बारसे (वय ६), संजय जगदिश पाहाडे (८), समर्थ अमोल जाधव (५), गौरव गजानन वाघमारे (५), प्राची प्रसाद भोजे (६), सिध्दिका आनंद भुसे (६) मयुर मारोती क्षीरसागर (१२), विशाल विरभद्र भुसे (४), युवराज अवधूत शिंदे (५), वैष्णव गजानन भोकरे (१२), सदाशिव गणेश क्षीरसागर (६), शुभांगी संतोष भुसे (५), नागेश नंदकिशोर जंगम ( ८ )हे विद्यार्थी जखमी झाले आहेत.या आपघात स्कूल बसचा चालक मनोज चंद्रकांत रणवीर (वय २९ रा. लहान) हे जखमी झाले आहेत.
पालकांची घटनास्थळी व रुग्णालयात धाव
या अपघाताची बातमी पालकांना कळाल्यानंतर पालकांनी घटनास्थळी धाव घेतली.आपघाताचे दृश्य पाहून पालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.पालकांनी ग्रामीण रूग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली.पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी ग्रामीण रूग्णालयात जाऊन जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली.
पालकांचा टाहो फोडला
ग्रामीण रूग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याने पालकांनी धाव घेतला. आपल्या चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली आहे हे कळल्यावर टाहो फोडायला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकृती विषयी माहिती देऊन धीर दिला.