शालेय मुलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर स्कूल बसगाडय़ांची तपासणी शाळेच्या सुट्टीपूर्वी करून घेणे ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाकडून अनिवार्य करण्यात आले आहे. यात गाडीतील आसनव्यवस्था, इंजिन, ब्रेक, आणि इतर तांत्रिक बाबी प्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासल्या जाणार आहेत. यात ‘फिटनेस प्रमाणपत्र’ असलेल्या बसगाडय़ांचीही तपासणी सक्तीची असून यासाठी कोणतेच शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परिवहन विभागाकडून स्कूल बसगाडीच्या तपासणीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सध्या मुंबई व उपनगरात सुमारे ९ हजार स्कूल बस चालवल्या जातात. यातून लाखो विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. मात्र स्कूल बसगाडय़ांचे वाहतूकदार स्कूल बसगाडय़ांची नियमावली पायदळी तुडवत असल्याचे पाहायला मिळते. याच धर्तीवर शाळकरी मुलांच्या वाहतुकीबाबत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जनहित याचिका सादर करण्यात आली होती. त्यानंतर नागपूर,उच्च न्यायलयाकडून स्कूल बसगाडय़ांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार ही तपासणी केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी तपासणीसाठी नकार दिला आहे.