लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : राजकीय फलकबाजीने क्रीडांगण व्यापल्याने शाळकरी मुलांनी मंगळवारी आयुक्तकाका खेळायचं कुठे असा सवाल करीत महापालिकेच्या प्रवेशदारातच खेळ मांडला.
सांगली शहरातील शामराव नगर भागात एकही क्रीडांगण नसल्याने तेथील शाळकरी मुलांनी मंगळवारी सांगली महापालिका आवारात विविध खेळ खेळून अनोखे आंदोलन केले. या मुलांनी राजकीय नेत्यांनी केलेल्या फलकबाजीची छायाचित्रे झळकावित सांगा, आम्ही कोठे खेळायला जायचे असा भाबडा प्रश्न उपस्थित करणारा फलक घेऊन आपल्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.
आणखी वाचा-सोलापूर : एमआरआय मशिनसाठी पतीकडून छळ; डॉक्टर पत्नीची आत्महत्या
शामरावनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांनी या अनोख्या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यात अर्णव कोळी, अबू शेख, अथर्व मोटे, आरुष दळवी, रुद्र कोरे, प्रथमेश धुमाळ, वेदराज दळवी, गोवर्धन भाट, जावेद मुल्ला, श्रावणी दळवी, रियान नदाफ, आराध्य सोनाळे व अक्षय कांबळे आदी मुलांनी सहभाग घेतला. या सर्व मुलांचे महापालिका सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी निवेदन स्वीकारले.
मुलांनी महापालिका आवारात जोरदार घोषणाबाजीही केली. आयुक्त काका क्रीडांगण द्या, व सुविधा नाहीत, क्रीडांगण तरी द्या अशी मागणी करणारे व “आम्ही खेळायचे तरी कोठे”, असा प्रश्न उपस्थित करणारे फलक झळकविले. त्यानंतर आपल्या या मागणीसाठी चक्क महापालिका आवारातच विविध खेळांचे डाव मांडले व या महापालिका आवाराला क्रीडांगणाचे स्वरुप देत अनोखे आंदोलन केले.