एकीकडे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांच्या शाळेबाहेर रांगा लागत असताना मराठी शाळांकडे मात्र अनेक पालक नाक मुरडताना दिसतात. भविष्यातील स्पर्धेसाठी आपलं मूल तयार व्हावं यासाठी अनेकजण इंग्रजी शाळांमध्येच मुलांना शिकवण्याकडे प्राधान्य देताना दिसतात. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री यांनी मराठी माध्यमांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालकांच्या इंग्रजी शिकण्याच्या हट्टापायी मराठी शाळा ओस पडत असताना वर्षा गायकवाड यांनी आता मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाईल असं सांगितलं आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांची ओळख करुन देण्यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तकं तयार असतील अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी काय सांगितलं?

“अनेक आमदारांनी सीबीएसई, आसीयएसईचा अभ्यासक्रम असा आहे सांगितलं. मी एक गोष्ट नम्रपणे सांगू इच्छिते की, आपलं एक बोर्ड असून त्याचंही अस्तित्व आहे. त्याचा अभ्यासक्रम कसा चांगला करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिलीचा अभ्यासक्रम बदल आहोत आणि आदर्श शाळा आहेत तिथे दुसरीचा अभ्यासक्रम बदलत आहोत,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेत चांगलं कळतं. पण त्याचसोबत त्या शब्दाला इंग्रजी शब्द काय आहे हे माहिती असावं म्हणून आम्ही हे करत आहोत. पुस्तकांचं ओझं होणार नाही याचं आपण तंतोतंत पालन करत आहोत. त्यामुळे आपण सध्या राज्याच पहिलीसाठी एकत्रित आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तकं आणत आहोत”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School education minister varsha gaikwad change is first year syllabus marathi medium school english words sgy