नवे दप्तर, वह्य़ा-पुस्तके, नवा गणवेश; गुलाबाची फुले, रांगोळय़ांनी केलेले स्वागत, प्रार्थनांचे स्वर आणि सा-यांतही पहिले पाऊल टाकणा-या चिमुरडय़ांची रडारड ..अशा संमिश्र भावनांनी आज शाळेचा पहिला दिवस सर्वत्र जागोजागीच्या शाळांमध्ये रंगला.
तब्बल पावणेदोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जागोजागीच्या शाळा आज पुन्हा गजबजल्या. नवे दप्तर, वह्य़ा-पुस्तके, नवा गणवेश घातलेल्या मुलांनी आज सकाळीच जागोजागीच्या शाळांचे प्रांगण गजबजून गेले होते. यामध्ये काही प्रथमच पाऊल टाकणारी मुलेही होती. या सा-यांचेच विविध शाळांमध्ये स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी अनेक शाळांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. आंब्याच्या डहाळ्या, तोरणे, फुगे, फलकावर आकर्षक चित्रे काढून मुलांचे स्वागत केले जात होते. या स्वागतासाठी काही ठिकाणी शिक्षक, कर्मचा-यांनीही आगळा पोशाख केलेला होता. सारेच वातावरण उत्साही, आनंदी असले तरी या सा-यात कुठे कुठे रडण्याचे सूरही आळवले जात होते. विशेषत: शाळेत प्रथमच पाऊल टाकणा-या पावलांची तगमग सर्वत्रच भरून राहिलेली होती. त्यांची समजूत घालणारे शिक्षक, पालकही जागोजागी दिसत होते. प्रार्थनेचे सामूहिक सूर उमटले आणि मग ख-या अर्थाने शाळा सुरू झाल्या. वर्गाची आज खास सजावट करण्यात आलेली होती. मुलांना शाळेची गोडी लागेल या पद्धतीने बदल केलेले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा