सांगली : बस वेळेत येत नसल्याने व डेपो ज्यादा बस सोडत नसल्याने मणेराजूरी (ता. तासगाव) येथील विद्यार्थिनींनी आक्रमक होत शनिवारी रस्त्यावर ठिय्या मारत रास्ता रोको केला. या मार्गावर गेल्या तीन महिन्यात पाचव्यांदा असे आंदोलन करण्याची वेळ या शाळकरी विद्यार्थिंनीवर आली आहे.मणेराजूरी मधून तासगावकडे जाणेसाठी बसच नसल्याने मणेराजूरी बस थांब्यासमोर हे आंदोलन करणेत आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तासगाव – कवठेमहांकाळ राज्यमार्गावर वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी झाली .
हेही वाचा >>> “फडणवीसांनी राणांना आवर घालण्याची गरज आहे”, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणा प्रत्युत्तर देत म्हणाले…
याबाबतची माहिती अशी की शनिवारी सकाळी नऊ वाजल्या पासून वाजल्यापासून मणेराजूरी योगेवाडीसह परिसरातून तासगावकडे कॉलेजला जाणेसाठी विद्यार्थिनी थांब्याला बसची वाट पाहत असताना सकाळपासून एकही बस आली नव्हती. अखेर अकरा वाजता कवठेमहांकाळ डेपोची एक बस आली. परंतु प्रचंड संख्येने असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनी असलेमुळे बसमध्ये जागाच नव्हती. त्यामुळे विदयार्थीनींचा संयम सुटला या विदयार्थिनींनी चक्क रस्त्यावरच बसूनच अचानक आंदोलन सुरु केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. अखेर तासगाव डेपोने ज्यादा एसटी बस सोडलेनंतर या विदयार्थ्यानीनी रस्त्यावरून उठल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे तासगाव – कवठेमहांकाळ राज्यमार्ग थांबला व प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. सुमारे एकतास हे आंदोलन सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळी येत पदाधिकारी व विद्याथीनींना समजावले तासगाव डेपोची जादा बस मागवून ही कोंडी सोडविली.