राज्यात दरवर्षी ज्या प्रमाणात रोपांची निर्मिती केली जाते, त्या तुलनेत त्यांची लागवडच होत नसल्याने कोटय़वधी रोपे शिल्लक राहात आहेत. लागवडीविना शिल्लक राहणाऱ्या रोपांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने शाळा व महाविद्यालयांसारख्या संस्थांना आता ही रोपे मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे, यापुढील काळात शैक्षणिक संस्थांना वृक्षारोपण सोहळे आयोजित करावयाचे असल्यास त्यांना रोपे खरेदी करावी लागणार नाहीत. शेतकऱ्यांनादेखील काही अटींवर मोफत स्वरूपात रोपे दिली जातील. खासगी स्वरूपात विक्रीसाठी लहान रोपांसाठी एक रुपया, तर मोठय़ा रोपांसाठी १० रुपये असा दर ठेवण्यात येणार आहे.
राज्यातील अधिकाधिक क्षेत्र वनाच्छादित करण्यासाठी वन विभागाने १०० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. त्या अंतर्गत दरवर्षी प्रत्येक विभागासाठी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करून त्यानुसार कार्यवाही केली जाते. नाशिक विभागाचा विचार करता २०१३-१४ या वर्षांसाठी साडेतीन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, सद्य:स्थितीत आठ कोटी रोपे तयार आहेत. वन विभागाचे उद्दिष्ट पूर्ण होऊनही साडेचार कोटी रोपे शिल्लक राहणार आहेत. इतर विभागांतही कमी-अधिक प्रमाणात वेगळी स्थिती नसल्याने कोटय़वधींच्या संख्येने शिल्लक राहणारी रोपे वाया जाण्याचा धोका असल्याने वन विभागाने वृक्ष लागवडीला चालना देण्याकरिता मोफत रोपे उपलब्ध करण्याची संकल्पना मांडली आहे. त्याची माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी येथे दिली.
शिल्लक राहणाऱ्या रोपांची लागवड होऊन काटेकोरपणे त्यांच्या संगोपनासाठी यंदाच्या वर्षांपासून हा उपक्रम राबविला जाईल. त्या अंतर्गत शाळा व महाविद्यालयांना त्यांच्या आवारात लागवडीसाठी मोफत स्वरूपात रोपे उपलब्ध करून दिली जातील. शेतकऱ्यांना मोफत रोपे देताना त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतले जाईल. त्यात रोपांचे काळजीपूर्वक संगोपन करण्याच्या हमीचा भाग राहील. शाळा, महाविद्यालये व शेतकरी या घटकांना मोफत स्वरूपात रोपे मिळणार असली तरी खासगी स्वरूपात ही रोपे घेण्यासाठी नाममात्र पैसे मोजावे लागतील. आकाराने लहान रोपासाठी एक रुपया, तर मोठय़ा रोपासाठी १० रुपये असा हा दर राहणार आहे.
राज्याच्या वनधोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शासकीय व पडित जमिनीचे क्षेत्र वगळून मोठय़ा क्षेत्राची कमतरता वन विभागाला भेडसावत आहे. या क्षेत्राची उणीव भरून काढण्यासाठी शेतीखालील क्षेत्र (बांधावरील वृक्ष लागवड) तसेच सामूहिक व खासगी जमिनीवरील वनव्याप्ती वाढविण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मोफत रोपे उपलब्ध केल्यावर वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी भासणारी जागेची कमतरता आणि शिल्लक राहणारी रोपे हे दोन्ही प्रश्न निकाली निघतील अशी वन विभागाला अपेक्षा आहे. दरम्यान, नाशिक विभागात यंदाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमानुसार साडेतीन कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आतापर्यंत दोन कोटी १९ लाख खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नाशिकसह राज्यातील सर्व विभागांत १५ जूनपर्यंत खड्डे खोदण्याचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा