बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बारामती येथे विज्ञान आणि नावीन्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे विज्ञान केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली जाईल, अशी घोषणा केली.
‘बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. कार्यक्रमाला राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत, डॉ. सी. डी. माई, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील, होमी भाभा विज्ञान आणि संशोधन केंद्राचे डॉ. अर्णव भट्टाचार्य, नेहरू विज्ञान केंद्राचे डॉ. सुब्रत चौधरी, तरुण वैज्ञानिक गोपाली जी., ‘अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे चेअरमन राजेंद्र पवार, प्रीती अदानी आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, की या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि उत्सुकतेत भर पडेल. जीवनात पुढे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक मनोभूमिका तयार केल्यास जीवनात यश नक्की मिळेल. विज्ञान आणि नावीन्यता केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची झेप लक्षात येईल आणि त्यातून वैज्ञानिकदृष्टी विकसित होईल.
विज्ञान केंद्राचे सर्वात पुढारलेले स्वरूप बारामतीला साकारत आहे. एक लाख विद्यार्थ्यांनी केंद्राला आतापर्यंत भेट दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वैज्ञानिकदृष्टी निर्माण होणे गरजेचे असून त्यासाठी केंद्र उपयुक्त ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्यांला वर्षांतून एकदा या केंद्रात जाता यावे असा प्रयत्न आहे. वैज्ञानिक प्रक्रियेचा आनंद अनुभवण्याची संधी या केंद्रात आहे.
– डॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग