सहाशे वष्रे जुन्या गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलावात रमण सायन्स सेंटरच्या धर्तीवर ‘विज्ञान बगीचा’ ची निर्मिती करण्यात येणार आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण अशा या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला आहे, तसेच तलावात पुलाचे बांधकाम व इकोर्निया सफाईसाठी मंजुरी दिली आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक रामाळा तलाव आहे. जवळपास ६०० वष्रे जुन्या या गोंडकालीन तलावाची निर्मिती गोंड राजाने केली होती. ऐतिहासिक काळात या तलावाचे पाणी राजे महाराजांसोबतच शहरातील लोकांना वापरासाठी खुले होते. देश स्वातंत्र झाल्यानंतर हा तलाव सर्वासाठी मोकळा करण्यात आला. सध्या या तलावात गणेश व शारदादेवीचे विसर्जन केले जाते, तर १९९७-९८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी कृष्णराव भोगे यांनी तलावात बगीचा विकसित केला. मात्र, हा बगीच्या आता केवळ प्रेमीयुगूलांच्या आणाभाका घेण्यापुरताच मर्यादित राहिलेला आहे.
दरम्यानच्या काळात इकोर्निया वनस्पतीच्या अतिक्रमणामुळे हा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तलाव जिवंतपणीच मृत्यूच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे बघून जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी तलाव जिवंत राहावा म्हणून येथे नागपूरच्या रमण सायन्स सेंटरच्या धर्तीवर ‘विज्ञान बगीचा’ निर्मितीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा एक कोटीचा प्राथमिक प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.
यंदा एमटीडीसीकडे निधी शिल्लक नसल्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळाली नसली तरी येत्या आर्थिक वर्षांत हा प्रकल्प आपण मंजूर करून घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विज्ञान बगीच्यात विज्ञानाशी संबंधित सर्व गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. या तसेच लगतच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना विज्ञानाशी निगडीत गोष्टी व अभ्यासासाठी नेहमीच नागपूर, पुणे, मुंबईच्या दिशेने धाव घ्यावी लागते, परंतु हा विज्ञान बगीचा तयार होताच या दोन्ही जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित सर्व गोष्टी येथेच सहज उपलब्ध होतील, अशीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
हा विज्ञान बगीचा म्हणजे नागपूरच्या रमण सायन्स सेंटरचे उपकेंद्राच्या धर्तीवर विकसीत केला जाणार आहे. या विज्ञान बगीचात जाण्यासाठी वेकोलिच्या रैयतवारी कॉलरी मार्गाने प्रवेशव्दार आहे, परंतु नव्या प्रस्तावानुसार आता रामाळा तलावातील गणेश विसर्जन स्थळापासून एका पायदळ पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. या पुलाला नुकतीच मंजुरी प्रदान करण्यात आली असून लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे, तर इकोर्नियाचे वाढते अतिक्रमण साफ करण्यासाठी निरीकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून येत्या तीन ते चार दिवसात कामाला सुरुवात होईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
या तलावात मच्छी नाल्यातून पाणी येते. त्यामुळे हा तलाव व मच्छी नाला साफ करण्याचा सुध्दा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भविष्यातही या तलावात इकोर्निया वनस्पतीचे अतिक्रमण वाढू नये म्हणून कायम उपाययोजना करण्यात येणार आहे. एकूणच इकोर्निया सफाई, पुलाचे बांधकाम व विज्ञान बगीच्या निर्मितीमुळे शहरातील लोकांना नियमित भेट देण्यासाठी एका चांगल्या स्थळाचा उदय होणार असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटली आहे

Story img Loader