हजारो बनावट प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचा आरोप

संतोष मासोळे

धुळे: महानगरपालिकेतील आरोग्य विभागाने लसीकरणाचे आठ ते १० हजार बनावट प्रमाणपत्रे वितरित करीत कोटय़वधींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर तक्रार देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाने अखेर पोलिसात तक्रार दिली. बनावट लसीकरण प्रमाणपत्राचे धागेदोरे धुळे शहरासह मालेगाव शहरापर्यंत पोहोचले आहेत. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह बाहेरील दलालांनी मिळून तीन हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्र वाटपातून कोटय़वधींची माया जमविल्याची चर्चा आहे.

लस न घेताच ही प्रमाणपत्रे वाटप झाल्याने भविष्यात धुळे, मालेगाव शहरांत करोनाचा उद्रेक झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार? इतके गंभीर प्रकरण असतानाही अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार देऊन महापालिका अजूनही कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मालेगावचे नागरिक धुळे येथून लसीकरण प्रमाणपत्र घेत आहेत. त्या प्रमाणपत्रावर पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेसाठी एकच बॅच क्रमांक ४१२१ एमसी ०९५ हा वापरण्यात आला आहे. हे बनावट प्रमाणपत्र असू शकते. तरी याबाबत चौकशी करून कारवाई करावी, असे लेखी पत्र मालेगाव आरोग्य विभागाने धुळे महापालिका आरोग्य विभागाला दिले. ही माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी या लसीकरण प्रमाणपत्र वाटपाचा शोध घेतला. त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली.  धुळे शहरातील एसव्हीकेएम नावाच्या लसीकरण केंद्रावर एका दिवसात तब्बल दोन हजार ४०० प्रमाणपत्रे दिली गेली. तसेच सुट्टीच्या दिवशी लसीकरण केंद्र बंद असतानादेखील मनपाच्या कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र वाटपाचा पराक्रम केला. शिवाय, लस न घेता ही प्रमाणपत्रे दिल्यामुळे नोंद झालेल्या लशीच्या कुपी (व्हायल) देखील काळय़ा बाजारात विकल्याचा आरोप शिवसेनेने केला. यातून जवळपास दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यताही सेनेने वर्तविली आहे.

लसीकरण घोटाळा वरिष्ठांच्या आदेशाने केल्याचे लेखी पत्र काही कर्मचाऱ्यांनी दिले आहे. एका राजकीय नेत्याच्या दबावामुळे थातुरमातुर कारवाई करून यातील बडय़ा मंडळींना वाचण्याचा प्रकार मनपात शिजतो आहे. तरी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली होती.  महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक शीतल नवले यांनीही याच प्रकरणावरून स्थायी समितीच्या सभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी सभेत बनावट लसीकरण प्रमाणपत्र वाटपाबाबत आयुक्त देवीदास टेकाळे यांनी आपली भूमिका मांडावी, असा आग्रह धरला होता. त्यानुसार आयुक्त टेकाळेंनी स्थायीच्या सभेतच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर साहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीमुळे अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रार काय?

लसीकरण मोहिमेदरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागातील संगणकाचा अज्ञात व्यक्तीने युजर आयडी आणि पासवर्ड चोरून २८ ऑक्टोबर, ४ आणि ६ डिसेंबर रोजी तीन हजार १९१ नागरिकांनी लस घेतल्याचे दर्शविले. मात्र, लस न घेताच या तीन हजार १९१ नागरिकांना बनावट लशींचे प्रमाणपत्र वाटण्यात आले, अशी तक्रार महापालिकेने दिली. यानंतर आरोग्य विभागाच्या संगणकाचा युजर आयडी आणि पासवर्ड कोणी चोरला, तो कोणी कार्यान्वित केला, याची तांत्रिक माहिती काढण्यात येत आहे.

बनावट लसीकरण प्रमाणपत्र वाटपप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आरोग्य विभागातील लसीकरणाची प्रशासकीय आणि तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे. तपासासाठी सायबर कक्षाचीही मदत घेतली जात आहे. चौकशीअंती दोषींना शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

– नितीन देशमुख (पोलीस निरीक्षक, धुळे)