शिवसेनाप्रमुखांनी आपणास आसूड कधी ओढायचा आणि तलवार कधी उपसायची याचे शिक्षण दिले आहे. जानेवारीपासून सरकारवर आसूड ओढण्यासाठी राज्यात राजकीय दौरा केला जाणार असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी येथे जाहीर केले. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर सोमवारी प्रथमच नाशिकला आलेल्या कार्याध्यक्षांनी भावनिक आवाहन करून शिवसैनिकांना साद घातली.
नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित विभागीय मेळाव्यात उद्धव ठाकरे व शिवसैनिक यांच्यातील ही भेट मन हेलावणारी ठरली. या भेटीची कारणमिमांसा करताना त्यांनी दु:ख हलके करण्यासाठी आपण कुटुंबीयांना भेटावयास आल्याचे सांगितले. शिवसैनिक हेच आपले खरे औषध व टॉनिक असल्याचे आवर्जून नमूद केले. शिवसैनिकांच्या भेटीसाठीचा हा दौरा असून तो राजकीय नसल्याचे त्यांनी याआधीच स्पष्ट केले होते. परंतु, या वेळी त्यांनी राजकीय दौऱ्याचा मुहूर्त सांगितला. कार्यक्रमात प्रारंभी, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आसूड व तलवार भेट म्हणून देण्यात आली. त्याचा संदर्भ घेत पुढील जानेवारी महिन्यापासून होणाऱ्या दौऱ्यात हा आसूड शासनावर ओढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना हे बाळासाहेबांनी अथक परिश्रमातून उभे केलेले वैभव आहे. ते सांभाळण्याची जबाबदारी आपण स्वीकारली असून त्यातून आपण कधीही मागे हटणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख या पदावर बसण्याची आपणासह इतर कोणाचीही पात्रता नाही. शिवसेनाप्रमुखांची सत्तेच्या पलीकडे ताकद होती. मराठी माणूस, हिंदू व हिंदुस्तानसाठी लढताना त्यांनी कोणाची तमा बाळगली नाही. शिवसेनाप्रमुखांनी जी हिंमत, विचार आणि लढण्याची ताकद दिली, त्यावरच शिवसेना मार्गक्रमण करणार आहे. पुढील काळात कितीही आव्हाने आली तरी शिवसैनिक डगमगणार नाहीत. शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला लढायला शिकविले आहे. त्यामुळे रडण्याऐवजी लढण्यासाठी सर्वानी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
भगवा हा त्यागाचा, धगधगत्या अग्नीचा रंग आहे. कितीही संकटे आली तरी संपूर्ण महाराष्ट्रात तो डौलाने फडकत राहील. विधानसभेवर पुन्हा भगवा झेंडा फडकावा, असे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वानी प्रयत्नरत राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तुम्हा शिवसैनिकांमध्ये आपणास बाळासाहेब दिसत असल्याचे त्यांनी सांगताच सभागृहातील वातावरण अधिकच भावनिक झाले.