गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. पण शिंदे गटाच्या बंडखोरीमागे कुणाचा हात आहे? बंडखोरी का झाली? बंडखोरी होणार याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती का? असे अनेक प्रश्न अद्याप कायम आहेत. याबाबतचे अनेक गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय हर्षल प्रधान यांनी केले आहेत. हर्षल प्रधान हे उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी आणि निष्ठावान म्हणून ओळखले जातात.
शिवसेना पक्षात बंडखोरी होणं, ही भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट आहे, असं खळबळजनक विधान हर्षल प्रधान यांनी केलं आहे. ते ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. सध्याच्या राजकीय सत्तांतराची विवेचना करताना ते म्हणाले, “शिवसेना पक्षात बंडखोरी होणं, ही भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट आहे. हे उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे. भाजपाला शिवसेना संपवायची आहे. त्यांना तुम्हाला (बंडखोर आमदारांना) मोठं करायचं नाही. आज ते तुमचा वापर करून घेत आहेत. तुमचा वापर संपला की ते तुम्हाला कुठेतरी अडगळीत टाकून देणार आहेत.”
“आम्ही शिवसैनिकाला मुख्यमंत्री केला, हे भाजपाला भासवून द्यायचं आहे. मूळात हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं असल्यानं त्यांना शिंदे गटाचा मुख्यमंत्री करावा लागला. ही भारतीय जनता पार्टीनं लिहिलेली स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारे राजकीय उलथापालथ झाल्याने शिवसेना कमजोर झाली नाही. तर महाराष्ट्रातील मराठी माणसाची ताकद कमजोर झाली आहे” असंही हर्षल प्रधानं म्हणाले.
सदा सरवणकर यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकानं बंडखोरी कशी काय केली? याबाबत विचारलं असता प्रधान म्हणाले, “भाजपानं एकाच वेळी ४० जणांची दिशाभूल केली आहे. भाजपाच्या स्क्रिप्टला मान्य करून तेही त्यांच्यासोबत फरफटत गेले आहेत. कारण आजही त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल आपुलकी आहे. ते आजही म्हणतात आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसैनिकांच्या बंडखोरीमुळे ठाकरे कुटुंब मनातून दुखावलं आहे. पण या कठीण काळातही ठाकरे कुटुंब कणखर राहिलं” असंही प्रधान यांनी नमूद केलं.
शिवसेना पक्षात यापूर्वीदेखील बंडखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता का? असा प्रश्न विचारला असता हर्षल प्रधान यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत याआधी २ ते ३ वेळा बंडखोरीचा प्रयत्न झाला असल्याच्या चर्चेला प्रधान यांनी दुजोरा दिला आहे. ही बाब उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. पण त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “हर्षल, असं होणार नाही रे, ते आपले शिवसैनिक आहेत. शिवसैनिक मला कधीही धोका देणार नाहीत.”
“उद्धव ठाकरे अत्यंत भावनिक आहेत. आजही त्यांच्या एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू आहे. महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका येऊ द्या, शिवसेना पुन्हा एकदा खंबीरपणे उभी राहील. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता ६३ नव्हे तर १०० चा आकडा गाठेल” असा विश्वासही प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला.