सांगली : पक्षविस्तारासाठी राज्यभर काढण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेवेळी कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. यावेळी पक्षाचे आ. इद्रिस नायकवडी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या गौरव रथयात्रेदरम्यान सांगलीत फोटो काढण्याच्या कारणावरून कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. गौरव रथयात्रा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि मुख्य पदाधिकाऱ्यांच्या समोरच हा प्रकार घडल्याने या प्रकाराची चर्चा होते आहे. हा वाद केवळ फोटोपुरता मर्यादित नसून, यामागे विकासकामासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंजूर केलेल्या पाच कोटी निधीच्या टक्केवारीच्या वादातून पुन्हा एकदा तणाव उफाळल्याची जोरदार चर्चा आहे.
मिरजेचे आमदार आ. नायकवडी यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे आणि जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून स्थानिक नेत्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळासाठी वाद शांत झाला असला तरी कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस कायम राहिली. काही वेळाने पुन्हा एकदा वादाचा धुरळा उडाला.घटनास्थळी असलेले पदाधिकारी व वरिष्ठ कार्यकर्ते या वादावर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असून सांगलीतील राष्ट्रवादी गटातल्या अंतर्गत वादाने पक्षासाठी नवीन डोकेदुखी निर्माण केल्याचे बोलले जात आहे.