Chhatrapati Shivaji Maharaj statue at Rajkot fort: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्ट महिन्यात कोसळला होता. या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. आता चार महिने उलटल्यानंतर राज्य सरकारने याठिकाणी ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅट्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते.
नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र २६ ऑगस्ट रोजी ३५ फुटांचा पुतळा कोसळला. यानंतर नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गार्नेट इंटिरियर्स आणि राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या दोन कंपन्यांनी पुतळ्याच्या कामासाठी निविदा दाखल केली होती.
हे वाचा >> Jayadeep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर चर्चेत आलेला शिल्पकार जयदीप आपटे कोण?
गार्नेट इंटिरियर्स या कंपनीने २०.९० कोटींची तर राम सुतार यांच्या कंपनीने ३६.०५ कोटींची निविदा दाखल केली. इतर बोलीदारांच्या कोटेशनची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला २०.९५ कोटींमध्ये हे काम देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, निविदेच्या अटींनुसार राम सुतार यांच्या कंपनीने इतर कंपन्यांपेक्षा अधिक दराने बोली लावली होती. पण नंतर वाटाघाटीमध्ये एल १ किंमतीशी जुळवून घेण्याची तयारी दर्शविली आणि म्हणूनच त्यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. हे काम त्यांना सहा महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे.
पुतळा कसा असणार?
द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी अनिल सुतार यांच्याशी संपर्क साधून कामाबाबत माहिती घेतली. ते म्हणाले की, आमच्या कंपनीला काम मिळाले असून कास्य धातूपासून ६० फूट उंचीचा ८ मीमी जाडीचा पुतळा बनविण्याचे काम आम्हाला मिळाले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची ६० फुट इतकी असणार आहे. तर पुतळा पेलण्यासाठी ३ मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार १०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर कंत्राटदार कंपनीने १० वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घातली आहे.
आधी ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल. कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतली जाईल. आधीच्या पुतळ्याला कला संचलनालयाची मान्यता घेतली गेली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता. सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या पुतळ्याचा प्रकल्प आयआयटी-मुंबई आणि अनुभवी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा, यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येईल.