शहरातील ३४ धार्मिक स्थळे हटविण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग हे महापालिका आयुक्तांना मदत करीत असल्याने त्यांच्यावर आगपाखड करताना खासदार चंद्रकांत खैरे यांचा पारा भलताच चढला. या अनुषंगाने आयोजित बठकीत पोलीस आयुक्तांनी जास्त शहाणपणा करु नये, असे वक्तव्य त्यांनी केले. आता सत्ता आमची आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांना सांगून कारवाई करू, असा इशाराही खैरे यांनी दिला. मोदी सरकारचा शपथविधी होऊन दुसराच दिवस आहे, हे विशेष. ‘हरामखोर, अक्कल नाही’ असा शब्दप्रयोग खैरे यांनी बैठकीत भूमिका मांडताना केला.
दरम्यान, धार्मिक स्थळे हटविण्याच्या वादाने आता खैरेंविरुद्ध महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे असे वळण घेतले आहे. शिवसेनेने या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगत खैरे यांनी आयुक्तांविरोधात शिवराळ भाषा वापरली. तसेच पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग यांनी महापालिकेच्या अवैध कामाला सहकार्य केले तर त्यांच्यावरही कारवाई करू, असेही ते म्हणाले.
शहरातील ३४ धार्मिक स्थळे हटविण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासनाकडून कारवाईच्या हालचालींना वेग आला आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेची भूमिका ठरविण्यासाठी आयोजित बठकीत खैरे यांचा पारा चांगलाच चढला. अधिकाऱ्यांच्या विरोधात गृहमंत्री आर. आर पाटील व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी खैरे यांच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन केले नाही.
शहरातील ३४ धार्मिक स्थळे काढण्यापूर्वी महापालिका आयुक्त कांबळे यांना न्यायालयाच्या अवमाननेची एवढी काळजी आहे तर त्यांनी समांतर जलवाहिनीच्या प्रकरणात का विलंब सहन केला, असा सवाल करीत आयुक्त कांबळे शहरातील वातावरणात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आराखडा तयार करीत असल्याचा आरोप खैरे यांनी केला. विशेष म्हणजे महापालिकेत शिवसेना-भाजपचीच सत्ता आहे. १४ रस्त्यांच्या रुंदीकरणात बाधित झालेल्या दोन हजारजणांना ना भरपाई म्हणून मोबदला दिला, ना चटई निर्देशांक व टीडीएस दिले. त्यामुळे अनेकजण नाराज असल्याचे सांगत धार्मिक स्थळे हटवताना दोन्ही धर्मीयांचे प्रत्येकी एक स्थळ काढावे. केवळ मंदिरे काढण्याचा घाट घातला गेला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
महापालिकेतील अधिकारी पसे घेऊन काम करतात, असेही ते एका प्रसंगी म्हणाले. न्यायालयात शपथपत्र दाखल करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचनाही त्यांनी महापौर कला ओझा यांना दिल्या. धार्मिक स्थळ पाडण्याची प्रक्रियाच अवैध असल्याचे सांगत खैरे म्हणाले की, अवैध कामात पोलीस आयुक्त मदत करणार असतील तर त्यांना जास्त शहाणपणा करू नका म्हणावे. हे संभाजीनगर आहे. आता सत्ता आमच्याकडे आहे. त्यामुळे थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना सांगून कारवाईदेखील करू.
बठकीत शिवसेनेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बठकीत बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास दोनदा तुम्ही माझा निरोप पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवा, असेही सांगायला ते विसरले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा