पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपीने जेव्हा पीडित तरुणीवर कोयत्याने हल्ला केला, तेव्हा पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीचा प्रतिकार केला. यानंतर आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. या दोन्ही तरुणांचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या दोघांचं मनभरुन कौतुक केलं आहे. शिवाय दोघांना प्रत्येकी ५१ हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हणाले, “पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला. या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. या बक्षीसातून त्यांच्या धाडसाचं मूल्य करता येणार नाही. पण त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल.”

नेमकी घटना काय?

२२ वर्षीय आरोपी शंतनु लक्ष्मण जाधव याने आज (मंगळवारी) सकाळी सदाशिव पेठेत पेरुगेट चौकीजवळ एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. पीडित तरुणी कोथरूड येथील सुतरदारा भागात राहायला आहे. आरोपीने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण उपस्थित नागरिकांनी हल्लेखोराचा पाठलाग करत त्याला पकडलं. पोलीसांनी आरोपी शंतनु लक्ष्मण जाधव वय २२ रा मुळशी डोंगरगाव येथील रहिवाशी आहे.

हेही वाचा- पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर…”

आरोपी शंतनु जाधव हा पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याने सदाशिव पेठेत पावन मारुती मंदिराजवळ सकाळी तरुणीला गाठले. तरुणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला झिडकारले. तेव्हा त्याने तिच्यावर कोयत्याने वार केले. यावेळी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आरोपीचा प्रतिकार केला. तरुणांच्या या धाडसामुळे पीडित विद्यार्थिनीचा जीव वाचला. यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपी जाधव याला नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि अप्पा बळवंत चौकात चोप दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scythe atteck on female stundet in pune jitendra awhad announced 51 thousand reward to who saved victims life rmm
Show comments