समाजसेवक अण्णा हजारे यांना आपल्या लेटरहेडवरून दिलेली धमकी म्हणजे विरोधकांनी राजकीय हेतूने केलेला प्रकार आहे. या कुटील कारस्थानाचा पोलिसांनी तपास करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नावाचा वापर करून अण्णा हजारे यांना धमकावणाऱ्यांमागील सूत्रधार शोधावेत, अशी मागणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली असल्याचे गोरे यांनी म्हटले आहे.
डॉ. पद्मसिंह पाटील हे निवडणुकीत पराभूत झाल्यास तुमचा पवनराजे करू, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एका पत्राद्वारे दिली होती. या पत्रासाठी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे हे जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाच्या लेटरहेडचा वापर केला गेला. अण्णा हजारे यांचे स्वीय सहायक श्यामकुमार पठारे यांनी या संदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष गोरे यांनी हा प्रकार म्हणजे विरोधकांनी दूरगामी राजकीय लाभ उठविण्यासाठी केलेले कुटील कारस्थान असल्याचा खुलासा एका पत्राद्वारे केला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना बदनाम करण्यासाठी सातत्याने समाजसेवक अण्णा हजारे यांना डॉ. पाटील यांच्या नावाचा वापर करून धमकावण्याचा प्रकार होत असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण व्हावे, हा यामागील हेतू आहे. अण्णा हजारे आणि डॉ. पाटील यांच्यातील संबंध बिघडविण्यासाठीचे हे षड्यंत्र असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अण्णा हजारे यांना धमकी; सूत्रधार शोधण्याची राष्ट्रवादीची मागणी
समाजसेवक अण्णा हजारे यांना आपल्या लेटरहेडवरून दिलेली धमकी म्हणजे विरोधकांनी राजकीय हेतूने केलेला प्रकार आहे. या कुटील कारस्थानाचा पोलिसांनी तपास करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे यांनी केली आहे.
First published on: 05-05-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Search anna hazare threat demand of ncp