संघ परिवारातील इतर संघटनांचे कार्यक्रम वेगवेगळे असले, तरी त्यामुळे भाजपसमोर अडचणी निर्माण होणार नाहीत. आम्ही सर्व राष्ट्रहिताच्या विषयावर एकत्र जुळलो आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा केली जात नाही. निर्णयही होत नाहीत. भाजपमधील पदांच्या संदर्भातील निर्णय भाजपच्या पातळीवरच घेतले जातील, असे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राजनाथ सिंह यांचे बुधवारी दुपारी येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. त्यांनी सांगितले, “भाजप स्वत: आपले कार्यक्रम ठरवतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे निर्णय भाजपच्या पक्षसंघटनात्मक पातळीवर घेतले जातील. वेळोवेळी निर्णयांची माहिती दिली जाईल. पण, अमरावतीत संघांच्या बैठकीत राजकीय विषय चर्चेला येण्याची कोणतीही शक्यता नाही. भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा विषय देखील बैठकीत उपस्थित होणार नाही. संघाच्या बैठकीत निवडणुकीची रणनिती ठरवली जात नाही.”
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. पदाचा विषय असो किंवा निर्णय प्रक्रियेचा, संघाच्या बैठकीत कोणतेही निर्णय घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जुळलेल्या विविध समविचारी संघटनांची ही एकत्रित बैठक आहे. राष्ट्रहिताच्या विषयावर संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होते. या संघटनांमधील समन्वयाचे कुठलेही संकट भाजपसमोर नाही. भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचार सुरू केला आहे.’ असे राजनाथ सिंह म्हणाले. केंद्र सरकारने शेजारच्या राष्ट्रांसोबतही परस्पर संबंध सुदृढ केलेले नाहीत. परराष्ट्र धोरणातही विसंगती आहेत. चीनसोबतच्या संबंधांमध्ये कडवटपणा आला आहे. ते सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. प्रश्न सोडवण्याचे कौशल्य या सरकारमध्ये नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. भाजप प्रमुख विरोधी पक्ष असतानाही निर्णय प्रक्रियेत भाजपला विश्वासात घेतले जात नाही. मनमानी पद्धतीने देशाचा कारभार सुरू आहे. देशातील जनता कंटाळली आहे. लोकच त्यांना धडा शिकवतील, असे त्यांनी सांगितले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आघाडीतून बाहेर पडल्यानंतर भाजपसमोरील अडचणी वाढल्या नाहीत काय, या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
पदांबाबतचे निर्णय भाजपच घेईल : राजनाथ सिंह
संघ परिवारातील इतर संघटनांचे कार्यक्रम वेगवेगळे असले, तरी त्यामुळे भाजपसमोर अडचणी निर्माण होणार नाहीत. आम्ही सर्व राष्ट्रहिताच्या विषयावर एकत्र जुळलो आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा केली जात नाही. निर्णयही होत नाहीत. भाजपमधील पदांच्या संदर्भातील निर्णय भाजपच्या पातळीवरच घेतले जातील, असे भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
First published on: 11-07-2013 at 03:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seat position decision bjp will take rajnath singh