Madhabi Puri Buch : हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर केलेल्या आरोपाचा परिणाम अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर झाला होता. एवढंच नाही तर सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे याचे पडसाद आर्थिक क्षेत्रापासून राजकीय वर्तुळापर्यंत उमटले होते. यानंतर आता सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्याविरोधात शेकडो सेबी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील मुख्यालयाबाहेर निदर्शने करत माधवी पुरी बुच यांच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने एका वृत्तात म्हटलं आहे.
सेबीमधील कर्मचाऱ्यांच्या एका गटाने गुरुवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुख्यालयात निदर्शने केली. हे निदर्शन जवळपास एका तासांहून अधिक काळ सुरु होते. या निदर्शनामध्ये सेबीचे जवळपास १०० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सेबी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह अर्थ मंत्रालयाला देण्यात आलेल्या पत्रात केलेले विधान मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
हेही वाचा : दीपक देशमुख यांना ‘ईडी’कडून अटक; ‘मायणी वैद्यकीय’ गैरव्यवहार प्रकरण
सेबीने आपल्या पत्रकात बुधवारी नियामक व्यवस्थापन आणि नेतृत्वाविरुद्ध कर्मचाऱ्यांना बाह्य शक्तींकडून आंदोलन करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला होता. तसेच कर्मचाऱ्यांची काही दिशाभूल करण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. तसेच स्पष्टीकरण देताना सेबीने असंही म्हटलं होतं की, सेबीच्या विश्वासार्हतेवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, यानंतर आता हे विधान मागे घेण्याची मागणी सेबीच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी केली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
सेबी प्रमुखांच्या अडचणीत भर?
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्याविरोधात शेकडो कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आता सेबीच्या कर्मचाऱ्यांनीच केलेल्या निदर्शनांमुळे सेबी प्रमुखांच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी केलेल्या निदर्शनानंतर व्यवस्थापनाने त्यांच्या तक्रारी सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, सेबीने बुधवारी संध्याकाळी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सागितलं की, “काही बाहेरील घटक कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या तक्रारी सरकारकडे मांडण्यासाठी आणि पत्रकारांपर्यंत जाण्यासाठी भडकवत आहेत.”
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातही सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता सेबीमधील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, हिंडेनबर्ग रिसर्चने माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर अदानी समूहाविरुद्धच्या चौकशीत हितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप केला होता. त्यानंतर माधवी पुरी बुच यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेसने आरोप केला होता की, “माधवी पुरी बुच या सेबीच्या प्रमुख असूनही त्यांनी आयसीआयसीआय बँकेकडून १६ कोटी पगार घेतला.” यानंतर बँकेने उत्तर देण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर बँकेकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.
© IE Online Media Services (P) Ltd