Maharashtra ST Employee Strike : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. याचा थेट फटका राज्यभरातील एसटी प्रवाशांना बसला. तर आजही जवळपास ९६ आगार पूर्णतः बंद आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय कामगार संघटनेच्या कार्यकारिणीची १४ ऑगस्ट रोजी बैठक घेवून कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला २७ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी कामगारांच्या जिल्हास्तरीय कार्यकारिणीने निदर्शने करून ३ सप्टेंबरपासून एसटी महामंडळ कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा दिला होता. तरीही राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर झाला. शुक्रवारी अनेक आगारातून वाहतूक विस्कळीत झाली होती. तर, आजही नोकरदारवर्गाचे हाल होत आहेत. आज सकाळी ८ वाजेपर्यंत राज्यभरातील एसटीच्या २५१ पैकी ९६ आगार पूर्णतः बंद आहेत. ८२ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू असून ७३ आगारांमधून पूर्णतः वाहतूक सुरळीत सुरू आहे.
महत्त्वाचं म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने झोडपलेलं असताना तिथे संपाचं लोण सर्वाधिक पसरलं आहे. मराठवाड्यात २६ आगार आणि खान्देशात ३२ आगार पूर्णतः बंद आहेत. तर मुंबई-पुणे मार्गावरील ई- शिवनेरी बस सेवा सुरळीत सुरू आहे.
हेही वाचा >> ST Bus Strike : एक हजार कामगार संपावर; लालपरीच्या पाचशे फेर्या रद्द, दैनंदिन २२ लाखांचे नुकसान
ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटीची धाव कर्मचारी आंदोलनामुळे मंगळवारी मंदावली. आजही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काल बैलपोळा असल्याने अनेक सरकारी कार्यालये बंद होती. परंतु, आज सरकारी आणि खासगी कार्यालये नियमित वेळेत सुरू होणार असल्याने नोकरदार वर्गाला मोठा मनस्ताप होत आहे. तसंच, ऐन गणेशोत्सव काळात आगारातून बस सुटत नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांत वाडी वस्त्यांना मुख्य शहराशी जोडणारी एसटीची सेवा ठप्प झाली आहे. गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
नम्र विनंती.. pic.twitter.com/QBS3gIkx1j
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) September 3, 2024
शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, वेतन वाढईतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी, करारातील त्रुटी दूर कराव्यात, शिस्त आणि आवेदन पद्धतीमधील बदल करावा, वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी एसटी महामंडळातील बहुतांश संघटनांनी स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीने हे आंदोलन पुकारले आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबर आज बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एसटी कामगार संघटनांची आज बैठक होणार आहे. तत्पुर्वी मंगळवारी दुपारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून सणासुदीच्या काळात आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करू नये, असे आवाहन सामंत यांनी केले. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास संघटनेने नकार दिल्यामुळे बैठकीत निघू शकला नाही. एसटी महामंडळानेही प्रवाशांची गैरसोय होईल, अशी कोणतीही कृती करू नये, असं आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आलं आहे.