अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवारी, सकाळी १० वाजता दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय मंत्री समितीची बैठक होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी येथे आयोजित जाहीर सभेत पवार यांनी ही माहिती दिली. आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निवडणुकीच्या प्रचारसभा बाजूला ठेवून आपण दिल्ली येथे या बैठकीसाठी जात आहोत, असे ते म्हणाले. गारपिटीमुळे महाराष्ट्रात २८ जिल्ह्य़ांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेशातही गारपिटीचा फटका बसला आहे. निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे सध्या अधिक काही बोलता येत नाही. परंतु आचारसंहिता उठल्यानंतर गारपीटग्रस्त शेतकरी उभा राहण्यासाठी मदत दिली जाईल. आपण आतापर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी सात निवडणुका जिंकल्या. ४७ वर्षे मला यामधून सुटी मिळाली नाही. परंतु या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचा आनंद असून पुढेही हे प्रयत्न सुरूच ठेवू. शेतीवर अवलंबून असणारा ७० टक्के वर्ग आर्थिकदृष्टय़ा सुधारल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. अनेकांना आमदार, खासदार, फौजदार इत्यादी पदव्या असतात. परंतु शेतकऱ्यांना मात्र न मागता एक पदवी मिळते, ती म्हणजे ‘थकबाकीदार’. आपण केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. त्यांच्या पीक कर्जाच्या व्याजदरात कपात केली. एकेकाळी देशातील शेतकऱ्यांना ८६ हजार कोटींचे पीक कर्ज मिळत असे. या वर्षी पीक कर्जाचा हा आकडा ४ टक्के व्याजदराने ७ लाख कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. २६३ दशलक्ष टन धान्याचे उत्पादन झाले आहे. सर्वानी शेतीवर अवलंबून राहू नये असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा माझ्यावर माध्यमांतून टीका होते. परंतु टाटाचे उत्पन्न २०० कोटी रुपयांवरून २० हजार कोटी आणि त्याही पुढे वाढत जाते. तर शेतकऱ्यांकडे २० एकर जमीन असेल, तर ती पुढे पुढे कमी होत जाऊन तो अल्पभूधारक आणि भूमिहीनही होतो. शेतकऱ्यांच्या घरातील एक मुलगा डॉक्टर, इंजिनीयर किंवा अन्य क्षेत्रांत गेला पाहिजे. संपूर्ण घर केवळ शेतीवर अवलंबून चालणार नाही. शहरीकरण, विविध विकासाचे प्रकल्प इत्यादींमुळे शेतजमिनींचे क्षेत्र कमी होत असून लोकसंख्या मात्र वाढत आहे, असेही पवार म्हणाले.

Story img Loader