लोकसत्ता प्रतिनिधी

अहिल्यानगर : महापौर केसरी पदाच्या किताबासाठी अहिल्यानगर शहरात आयोजित महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने आयोजित केलेली पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे या दोघा पहेलवानांमधील लढतीचा निकाल वादग्रस्त ठरला. मात्र, असे असले तरी पहिलवानांच्या आणखी एका संघटनेने, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने महापौर केसरी किताबासाठी पुन्हा स्वतंत्र मैदान अहिल्यानगर जिल्ह्यातच आयोजित केले आहे.

अहिल्यानगर शहरातील कुस्ती स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केले होते तर आता दुसऱ्या महाराष्ट्र केसरी पदाच्या किताबी लढतीच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी स्वीकारले आहे.

यासंदर्भात जिल्हा तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्पर्धेच्या आयोजनाचे पत्र आमदार रोहित पवार यांनी स्वीकारले आहे. कुस्तीगिरांच्या महाराष्ट्र संघटनेत फूट पडून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र कुस्तीगीर संघ अशा दोन स्वतंत्र संघटना स्थापन झाल्या आहेत. कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भाजपचे माजी खासदार रामदास तडस आहेत तर कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. मात्र या दोन्ही संघटनांकडून अहिल्यानगरमध्येच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाने सन २०२४-२५ च्या ६६ व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची मागणी केली होती. त्याला मान्यता देण्यात आली व जिल्हा तालीम संघाने स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्यावर सोपवली. तसे पत्र आमदार रोहित पवार यांना दिले.

स्पर्धेच्या आयोजनाची हे निमंत्रण जिल्हा तालीम संघाचे खजिनदार नाना डोंगरे, शहर तालीम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, पाथर्डी तालुका संघाचे सचिव पप्पू शिरसाठ, शेवगाव तालुका तालीम संघाचे अध्यक्ष विक्रम बारवकर, ऋषिकेश धांडे, काका शेळके, मीठू धांडे, विजय मोढळे, असिफ शेख आदींनी आमदार रोहित पवार यांना दिले आहे.

कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व किताबी लढत आयोजित केली होती तर आता कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ६६ वी किताबी लढत आयोजित करण्यात आली आहे. पहेलवानांच्या राज्य संघटनेत दोन वर्षांपूर्वी फूट पडली असली तरी दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कुस्तीगीर संघाने थेट ६७ महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त स्पर्धा कोणाची? याबद्दल राज्यातील पहेलवानांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

कुस्तीगीर परिषदेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर बोलताना आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन अत्यंत दिमाघदार व योग्य पद्धतीने करण्याची ग्वाही दिली. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, वस्ताद व पहेलवानांचा योग्य मानसन्मान करून ही स्पर्धा पार पाडली जाणार आहे. कुस्ती स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे ते म्हणाले. रोहित पवार यांच्या मार्गदर्शक खाली स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडेल अशी अपेक्षा जिल्हा तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील कुस्तीगीरांच्या फूट पडलेल्या दोन्ही संघटनांकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनासाठी अहिल्यानगरचीच निवड केली जात आहे आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडलेल्याच दोन आमदारांकडून ही किताबी लढत आयोजित केली जात आहे. याबद्दल पहिलवानांमध्ये उत्सुकता व्यक्त केली जात आहे. कुस्तीगीर संघाच्या किताबी लढतीचा निकाल वादग्रस्त ठरला, आता कुस्तीगीर परिषदेच्या लढतीचा निकाल कशा पद्धतीने लागला जातो, याकडे लक्ष राहणार आहे. यानिमित्ताने जिल्हा कुस्तीगीर संघ व जिल्हा तालीम संघ यांच्यामध्येही डाव-प्रतिडाव खेळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader