कसाबला फाशी देण्यासाठी पुण्यातील येरवडा कारागृहाची निवड करण्यात आली आणि फाशीसुद्धा दिली गेली, पण त्याबाबत पोलिसांनीही इतकी गोपनीयता पाळली, की पुण्यातील केवळ तीन अतिवरिष्ठ पोलीस अधिकारी वगळता इतर कोणालाही पुण्यात काय होणार आहे याची कल्पना नव्हती!
कसाब याला पुण्याकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा गृहविभागाकडून पुण्याच्या पोलीस आयुक्तांना त्याबाबत कल्पना देण्यात आली. त्यानंतर केवळ दोन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना हे सांगण्यात आले. कसाबची फाशी ही घटना अतिशय संवेदनशील असल्याने त्याबाबत बाहेर काही कळणे उपयोगाचे नव्हते, पण त्याच वेळी पुरेसा बंदोबस्त राखणेही आवश्यक होते. त्यामुळे सर्व पोलीस उपायुक्तांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सर्वजण सज्ज होते, पण हे सारे कशासाठी? याची त्यांनाही कल्पना नव्हती.
येरवडा कारागृहाच्या परिसरात जास्तीचा बंदोबस्त ठेवणे आवश्यक होते. कसाबच्या बाबतीत कोणाताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळेच अगदी येरवडा कारागृहावर हल्ला झाला तर काय, अशी शक्यता गृहित धरून सर्व तयारी करण्यात आली होती. त्यासाठी येरवडा कारागृहापासून काही अंतरावर पोलिसांच्या कंपन्या सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. शहरात दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली ‘क्विक रिस्पॉन्स टीन’ही त्या परिसरात दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर ठेवण्यात आली होती. बंदोबस्तात वाढ केली तरी तो मोहरम आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची प्रतिक्रिया येऊ नये म्हणून ठेवला आहे, असे भासविण्यात आले. त्याचसाठी म्हणून कारागृहाच्या आसपास नाकेबंदीही करण्यात आली. काहीतरी वेगळे घडते आहे याची शंका येऊ नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे कोणाला संशय न येताच येरवडा कारागृहाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. बातमी बाहेर फुटू नये याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते.
त्यामुळे बुधवारी सकाळी कसाब याला फाशी देण्यात आल्यानंतर त्या परिसरात बंदोबस्तावर असलेले कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीही ती आश्चर्याची बातमी होती.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा