वाई : मांढरदेव (ता. वाई )येथे श्री काळुबाई देवीची यात्रा व दि. ५ ते ७ जानेवारी या कालावधीत होणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ४जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत परिसरात प्रतिबंधात्मक बंदी आदेश तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, वाई रणजित भोसले यांनी आदेश जारी केले आहेत
या प्रतिबंधात्मक बंदी आदेशानुसार मांढरदेव परिसरामध्ये यात्रा कालावधीमध्ये पशुहत्या करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोंबड्या, बकऱ्या, बोकड इ. प्राण्याचा बळी देण्यास, हत्या करण्यास तसेच वाहनातून यात्रेच्या ठिकाणी घेवून जाण्यास मनाई, प्रतिबंध करण्यात आले आहे. मांढरदेव परिसरात वाद्य आणण्यास व वाजविण्यास बंदी करण्यात आलेली आहे. मांढरदेव परिसरात तसेच देवालयाच्या परिसरात असणाऱ्या झाडांवर खिळे ठोकण्यास, लिंबू टाकणे, काळ्या बाहुल्या, बिबे, भानामती करणे, करणी करण्यास प्रतिबंध करण्यास आलेले आहे. मांढरदेव मंदिर परिसरामध्ये नारळ फोडणे, तेल वाहण्यास पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. तसेच परिसरात दारु, मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.
जिल्हा न्यायाधीश,जिल्हाधिकारी व प्रशासनाकडून मंदिर,यात्रा परिसराची पाहणी
मांढरदेव यात्रा अनुषंगाने प्रशासनाकडून जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ शितल जानवे-खराडे,पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी यांनी श्री काळुबाई मंदिर यात्रा परिसराची मंदिर ट्रस्ट व प्रशासनाच्या विविध विभागानी केलेल्या तयारीचीआज प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले व कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यात्रा कालावधी दरम्यान दक्ष राहून काम करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.मयात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांढरदेव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केल्या.