राज्याच्या निरनिराळ्या भागात हवामानाचे असलेले भिन्न स्वरूप लक्षात घेऊन यापुढे कृषी हवामान प्रदेशानुसार शेतीचे धोरण ठरवण्यात येईल, असे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे जाहीर केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चरतर्फे आयोजित कृषी व फलोत्पादन परिषदेचे उद्घाटन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्य़ातील आंबा उत्पादक शेतकरी परिषदेला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना विखे-पाटील म्हणाले की, राज्याच्या निरनिराळ्या भागात भिन्न प्रकारचे हवामान असते. त्याचप्रमाणे पावसाच्या प्रमाणातही कमालीची तफावत असते. तरीसुद्धा संपूर्ण राज्यासाठी एकच कृषी धोरण राबवण्यात येते. हवामानानुसार राज्याचे ९ कृषी हवामान (अॅग्रो-क्लायमेटिक) विभाग पडतात. त्यामुळे यापुढील काळात या विभागांचा विचार करून त्या त्या विभागाला अनुरूप शेतीविषयक धोरण राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कोकणातील फळबाग उत्पादकांची दीर्घकाळची मागणी लक्षात घेऊन येथे आंबा-काजू मंडळ स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार येत्या सहा महिन्यात कार्यवाही होईल. पण या पुढील काळात आंबा उत्पादकांनी फळप्रक्रिया व निर्यातीवर जास्त भर देण्याची गरज आहे, असेही विखे-पाटील यांनी नमूद केले. राज्य पणन मंडळाचे येथील विभागीय कार्यालय गेल्या वर्षी शासनाने वाशी येथे हलवले. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्याची नोंद घेत हे कार्यालय पुन्हा रत्नागिरीत आणत असल्याचे विखे-पाटील यांनी जाहीर केले. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मात्र निरुपयोगी ठरल्या असल्याचे मत स्पष्टपणे मांडून कृषिमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांचा माल ग्राहकांना थेट उपलब्ध झाल्यास दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे आहे, हे लक्षात घेऊन शहरांमध्ये त्यासाठी विक्री केंद्रे निर्माण करण्याचा शासनाचा मनोदय आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला येथील प्रगतशील आंबा उत्पादक डॉ.विवेक भिडे यांनी गेली तीन वष्रे कोकणात लहरी हवामानाचा फटका आंब्याच्या पिकाला बसत असल्याचे निदर्शनास आणून देत आंब्यासह काजू, फणस, करवंदे इत्यादीवरील संशोधनासाठी रत्नागिरीत केंद्रीय संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी केली, तर दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी आंब्याच्या कलमांची इन्डो-इस्रायल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने छाटणी व नियोजन अतिशय लाभदायक ठरत असल्याचे नमूद करून झाडांच्या पुनरुज्जीवनावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली. जिल्’ााचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी कोकणात छोटय़ा स्वरुपातील फळप्रक्रिया उद्योगांची साखळी निर्माण करण्यात यावी अशी सूचना केली.
दिवसभर चाललेल्या या परिषदेत आंबा बागायतीच्या विविध तांत्रिक बाजूंबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
विभागीय पीक धोरण हवामानानुसार आखणार
राज्याच्या निरनिराळ्या भागात हवामानाचे असलेले भिन्न स्वरूप लक्षात घेऊन यापुढे कृषी हवामान प्रदेशानुसार शेतीचे धोरण ठरवण्यात येईल, असे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे जाहीर केले.
First published on: 07-12-2012 at 05:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sectional crop policy according to climate