येत्या २ डिसेंबरपासून सुरू होणारा नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह हाणून पाडण्यासाठी पूर्व विदर्भातील सुरक्षा दलांनी यंदा प्रथमच फलक युद्ध छेडले आहे. या चळवळीचा फोलपणा सांगणारे हजारो फलक नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या दुर्गम भागात लावण्यात आले आहेत.  नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान हा पीएलजीए सप्ताह पाळतात. या वेळी सुद्धा या सप्ताहात दंडकारण्य भागातील सर्व जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन करणारी पत्रके नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी टाकलेली आहेत. या सप्ताहाच्या काळात नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात बंदसदृश स्थिती असते. नक्षलवादी ठिकठिकाणी झाडे तोडून रस्त्यावर आणून टाकतात. या सप्ताहाच्या काळात मनुष्यबळ गोळा करण्यावर नक्षलवाद्यांचा भर असतो. यासाठी ते अनेक गावांमध्ये बैठका घेतात. यातून जनमुक्ती सेनेत सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही तर जबरदस्तीने तरुणांना चळवळीत ओढले जाते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन यंदा पूर्व विदर्भात तैनात असलेल्या सुरक्षा दल, तसेच पोलिसांनी नक्षलवाद्यांचे हे मनसुबे हाणून पाडण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर फलक आणि पत्रकयुद्ध छेडले आहे.  गडचिरोली व गोंदिया जिल्हय़ातील पोलीस व सुरक्षा दलांनी या चळवळीचा फोलपणा सांगणारे २५ हजार फलक तयार केले असून ते ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत. गोंदिया जिल्हय़ातील देवरी, चिचगड तसेच गडचिरोली जिल्हय़ातील कोरची, कुरखेडा, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा तालुक्यातील दुर्गम भागात हे फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय छोटी पत्रकेसुद्धा तयार करण्यात आली असून शोधमोहिमेवर जाणाऱ्या जवानांमार्फत ती गावागावात वितरित करण्यात येत आहे. या फलकांवर ही चळवळ कशी देशविघातक व लोकशाहीविरोधी आहे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या चळवळीने आजवर आदिवासींचे शोषण कसे केले याची माहिती उदाहरणासहित या फलकांवर देण्यात आली आहे. या चळवळीतून फुटून बाहेर पडलेला ओरिसाचा जहाल नक्षलवादी सव्यसाची पांडाने नक्षलवादी नेतृत्वाला पाठविलेल्या चौदा पानी पत्रात अनेक आरोप केले होते. याशिवाय नुकताच आंध्र पोलिसांपुढे शरण आलेला जहाल नक्षलवादी शेखरने सुद्धा या चळवळीतील गैरकृत्यांवर पोलिसांना दिलेल्या जबाबात बराच प्रकाश टाकला. या सर्व मजकुराचा आधार हे फलक तयार करण्यासाठी घेण्यात आला आहे. ही चळवळ वाईट आहे, असे सरकार म्हणत नाही तर यात आजवर कार्यरत असलेले नक्षलवादी नेतेच म्हणतात असे या फलकांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी सुरू केला आहे. या जनजागृतीमुळे नक्षलवाद्यांच्या मनुष्यबळ गोळा करण्याच्या मोहिमेला आळा बसेल असा विश्वास गडचिरोली व गोंदियाचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त  केला.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा