ढोल-ताशे.. बॅण्ड पथकाचा दणदणाट..नाशिकमध्ये ‘सियावर रामचंद्र की जय’ तर त्र्यंबकमध्ये ‘बम बम भोले’च्या जयघोषात सिंहस्थातील पहिली पर्वणी साधू-महंतांच्या अपूर्व उत्साहात पार पडली. प्रशासनाच्या अपेक्षित अंदाजापेक्षा कमी संख्येने भाविक पर्वणीला दाखल झाल्याचे खापर पोलिसांच्या अतिरेकी सुरक्षा व्यवस्थेवर फोडले जात आहे.
त्र्यंबक येथे पहाटे तीन वाजता तर नाशिक येथे सकाळी सहा वाजता अभूतपूर्व उत्साहात आणि कडेकोट बंदोबस्तात शाही मिरवणुकीला सुरुवात झाली. पोलिसांच्या र्निबधांमुळे भाविकांना शाही मार्गावर दुतर्फा उभे राहून ही मिरवणूक पाहता आली नाही. त्यामुळे शाही मार्गावर वास्तव्यास असणाऱ्यांना ‘दूर’दर्शनवरच समाधान मानावे लागले. सजविलेल्या रथांवर खास चांदीच्या आसनांवर अनेक महंत विराजमान झाले होते. नाशिक येथे वैष्णवपंथीय तीन आखाडय़ांचे जवळपास ७०० खालसे तर त्र्यंबकेश्वर येथे नागपंथीय दहा आखाडे यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. अग्रस्थानी धर्मध्वजा घेऊन मार्गक्रमण करताना भाले, तलवारी, कृपाण, दांडपट्टा आदी पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. नाशिकच्या मिरवणुकीत पुढे जाण्यावरून दिगंबरचे खालसे आणि निर्मोही आखाडय़ाचे खालसे यांच्यात वाद झाले. दिगंबरचे ४०० खालसे असल्याने त्यांचे सजविलेले रथ निघण्यास काहीसा विलंब झाला. पोलिसांनी सातची वेळ दिली असल्याचे सांगत निर्मोही आखाडय़ाने आपल्या मिरवणुकीला सुरुवात केली. यामुळे दिगंबरच्या खालशांचे सहा ते सात रथ मागे अडकून पडले. निर्मोहीने त्यांना अखेपर्यंत पुढे जाऊ दिले नाही. त्यांच्या रथाची फुले तोडली. आयुर्वेदिकमहाविद्यालयालगत काही साधूंनी लोखंडी जाळ्या पाडल्या. रामकुंडाजवळ मिरवणूक पोहोचल्यानंतर भाविकांनी घुसखोरी करण्यास सुरुवात केली. रामकुंडात आखाडय़ांच्या शाही स्नानाआधीच दहा ते बारा साधूंनी संधी साधत स्नान करून सर्वानाच चकित केले. महंत ग्यानदास यांचे आगमन झाल्यावर धक्काबुक्कीचा किरकोळ प्रकारही घडला. निर्वाणी, दिगंबर आणि निर्मोही या क्रमाने आखाडय़ांचे शाही स्नान झाले. काही साधू खास माध्यमांसाठी वारंवार ‘पोज’ देण्यात गुंग होत असल्याने सुरक्षारक्षक हैराण झाले होते. शाही स्नानास सुरुवात होण्यापूर्वी पहाटे साडेतीनच्या सुमारास जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी रामकुंडात स्नान करण्याची संधी न मिळाल्याने गौरी पटांगणावर स्नान केले. हेलिकॉप्टरने मिरवणुकीत सहभागी होण्याच्या मागणीवर प्रशासनाने कोणतेही उत्तर न दिल्यामुळे कॉम्प्युटर बाबा जमिनीवर आले. म्हणजे त्यांना रथावर समाधान मानावे लागले. यावरून प्रशासनावर त्यांनी आगपाखड केली. साध्वी त्रिकाल भवन्ता यांनी महिलांसाठी स्वतंत्र घाटाची मागणी मान्य न झाल्यामुळे पहिल्या शाही स्नानावर बहिष्कार टाकला.
दुसरीकडे पहाटे तीनपासूनच नागा साधूंच्या बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषाने त्र्यंबक नगरी दुमदुमली. नील पर्वताच्या पायथ्याशी खंडोबा मंदिरापासून जुना आखाडा, आवाहन आणि अग्नी आखाडय़ाची मिरवणूक सुरू झाली. अनेक आखाडय़ांनी रत्नजडित आभूषणांनी मढलेल्या सोन्या-चांदीच्या देवता, सुवर्ण-चांदीचे आवरण असणाऱ्या सिंहासनांद्वारे आपली श्रीमंती अधोरेखित केली. मिरवणुकीचे त्र्यंबकवासीयांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत केले. पंचनाम जुना, पंचायती आवाहन, पंचायती अग्नी, निरंजनी, आनंद, महानिर्वाणी, अटल या आखाडय़ांनी क्रमाने कुशावर्त कुंडात स्नान केले. गर्दीचे नियोजन करताना केवळ त्या त्या आखाडय़ांच्या महंतांना स्नान करण्यास कुशावर्तात जाऊ दिल्याने अन्य आखाडा पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद झाले. सकाळी सहा ते आठ ही वेळ वैष्णव पंथीयांसाठी राखीव असल्याने शाही स्नान काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते. आठनंतर जुना उदासीन, नवा उदासीन तसेच निर्माण पंचायती आखाडय़ाने स्नान केले. शाही स्नानानंतर त्र्यंबक राजाचे दर्शन घेत साधू-महंतांनी प्रस्थान केले. या वेळी भाविकांकडून कुशावर्त परिसरासह अन्य ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याने काहींना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला.

Story img Loader