जालना जिल्हय़ात २० जुलैपर्यंत अपेक्षित सरासरी पाऊस २४४ मि.मी. एवढा असताना प्रत्यक्षात ६६ मि.मी. एवढा कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ २७ टक्के पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम खरिपांच्या पेरण्या खोळंबण्यात झालेला आहे. अशा अनिश्चित पाऊसमानाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपत्कालीन पीक नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यू. आर. घाटगे आणि जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बप्पासाहेब गोल्डे यांनी केले आहे.
जालना जिल्हय़ात २० जुलैपर्यंत एकाही तालुक्यात अपेक्षित सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. सर्वात कमी १३.४७ टक्के पाऊस बदनापूर तालुक्यात झालेला असून, सर्वाधिक पावसाची नोंद (४९.७४ टक्के) परतूर तालुक्यात झालेली आहे. अन्य तालुक्यांतील पावसाची आजपर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे : जालना- ३३.०४, भोकरदन-२९.७९, जाफराबाद-१९.२१, मंठा-१५.९८, अंबड-३१.८७ आणि घनसावंगी-२७.२४. कमी पावसाच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये कोणती पिके घ्यावीत, याबाबत संभ्रम अवस्था आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने अशा परिस्थितीत पर्यायी आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यावर पेरणी करणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत शक्यतो मूग आणि उडीद ही पिके घेऊ नयेत. ३१ जुलैपर्यंत पाऊस झाल्यास सोयाबीन, तूर, बाजरी, एरंडी, सूर्यफूल ही पिके घेणे योग्य ठरेल. शक्यतो २५ जुलैनंतर कापूस लागवड करू नये. मका हे सर्व हंगामात घेण्यासारखे पीक असल्याने पाऊस किती लांबला तरी ते घेता येऊ शकेल. शक्यतो आंतरपीक पद्धती अवलंबावी. सोयाबीनसह इतर बियाण्यांची लागवड करताना बावीस्टीन किंवा थायरम प्रक्रिया करावी. त्यामुळे बियाणे जमिनीत रुजून नुकसान होणार नाही. अशा प्रकारचे पीक नियोजन केले तर पिकांचे संभाव्य नुकसान कमी होऊ शकेल, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
पावसाअभावी जालना जिल्हय़ात पेरण्या खोळंबल्या
जालना जिल्हय़ात २० जुलैपर्यंत अपेक्षित सरासरी पाऊस २४४ मि.मी. एवढा असताना प्रत्यक्षात ६६ मि.मी. एवढा कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ २७ टक्के पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम खरिपांच्या पेरण्या खोळंबण्यात झालेला आहे.
First published on: 21-07-2014 at 01:20 IST
TOPICSपेंडिंग
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seeding pending without rain in jalna district