धाराशिव : हलगीचा कडकडाट, संबळाचा कर्णमधुर निनाद आणि आई राजा उदोउदोच्या जयघोषात फुलांची आणि कुंकवाची मुक्त उधळण करीत रविवारी पहाटे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नगरहून आलेल्या मानाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी भल्या पहाटे मोठी गर्दी केली होती.

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात मंदिरात रविवारी १३ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे साडेचार वाजेपासूनच विधीवत पूजा व आरती करुन तुळजाभवानी देवीचे माहेर असलेल्या अहिल्यानगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी टेकवून पुन्हा मोठ्या भक्तिभावाने आरती करण्यात आली.

हेही वाचा – Baba Siddique : “बाबा सिद्दीकींना छातीवर दोन गोळ्या लागल्या, ज्या…” ; डॉ. जलील पारकर यांची महत्त्वाची माहिती

या भक्तिमय मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पद्धतीने मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि पारंपरिक वाद्य संबळाच्या साथीने सर्व विधी करण्यात आले. तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघनानंतर देवीची मूर्ती पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. यावेळी देवीच्या मुर्तीला इजा होऊ नये म्हणून १०८ साड्या परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार अहिल्यानगरच्या भक्तांनी देवीची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले. यावेळी उपस्थित सर्व भाविकांनी कुंकू व फुलांची उधळण करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.

हेही वाचा – दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यभरात सोने खरेदीची लगबग

यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये पुजारी मंडळ व भोपे पुजारी मंडळाचे पदाधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.