जुना मोंढा परिसरातील दुकानात छापा टाकून सुमारे ६ लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. विशेष बाब म्हणजे याच दुकानावर पूर्वी तीन वेळा छापा टाकून गुटखा जप्त करण्यात आला होता.
स्थानिक पोलिसांना हाताशी धरून शहरात जुना मोंढा परिसरातील दिनेश एजन्सीचा मालक गोपाल पुरुषोत्तम दाडिया अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे गुटख्याची विक्री करीत होता. गुटखा बंदीनंतरही त्याचा धंदा सुरूच होता. या पूर्वी अन्न व औषध प्रशासनाने ३ वेळा छापे टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता. तीनदा कारवाई झाल्याने गोपाळ दाडिया हा व्यवसाय बंद करील, असे वाटत होते. परंतु काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याचा उद्योग सुरूच राहिला.
दुकानात मोठय़ा प्रमाणात गुटखा आल्याची माहिती मिळाल्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या वेळी गोवा, सितार, बॉम्बे, दिलदार, नजर या कंपनीच्या गुटख्याचा मोठा साठा सापडला. पोलिसांनी हा सर्व गुटखा जप्त केला. दाडिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. शहर व परिसरात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख प्रवीण काळे यांनी अनेक ठिकाणी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.

Story img Loader