नगर जिल्हय़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या खासगी मालकीच्या ‘साईकृपा’ या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे पैसे अदा न केल्याने साखर आयुक्त विजयकुमार सिंघल यांनी साखर जप्तीची नोटीस बजावली आहे. त्यावर येत्या  दि. १२ रोजी सुनावणी ठेवली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा फेज २ या कारखान्याने चालू गळीत हंगामात राहुरी, नेवासे, इंदापूर, दौंड, बारामती या भागांतून ऊस आणला होता. फेब्रुवारीनंतर गळितास आलेल्या उसाचा पहिला हप्ताही शेतकऱ्यांना दिला नाही. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. काल (गुरुवार) प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांना शेतकरी संघटनेने घेराव घातला होता. त्यातून मार्ग न निघाल्याने आज कारखाना कार्यस्थळावर जाऊन शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनात ज्ञानदेव आढाव, हरिभाऊ कोळसे, रेवणनाथ कोळसे, सर्जेराव जाधव, चंद्रकांत आढाव, कैलास डावखर आदी शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. व्यवस्थापनाने सोमवार दि.१० पर्यंत उसाचे पैसे अदा करण्याचे कबूल केले. पण यापूर्वी कारखान्याने दिलेले धनादेश वटले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रकमा वर्ग कराव्यात अशी मागणी करण्यात आली. साखर सहसंचालक भालेराव यांनी प्रतिनिधी पाठवून शेतकरी व व्यवस्थापनात चर्चा घडवून आणली.
उसाचे थकीत पैसे देण्यासाठी कारखान्याची साखर जप्त करण्यात येईल. या साखरेची विक्री करून शेतकऱ्यांना उचित व लाभदायक मूल्यानुसार येणारी रक्कम अदा करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. साखर जप्त करण्यासाठी साखर आयुक्त सिंघल यांनी आज कारखान्याला नोटीस बजावली. तसेच बुधवार दि.१२ रोजी पुणे येथे सुनावणी ठेवली आहे. त्या वेळी साखर जप्तीचा निर्णय घेतला जाईल. या कारखान्याकडे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंधरा तर अन्य भागातील शेतकऱ्यांचे १० कोटी रुपये थकले आहेत. संचालक विक्रम पाचपुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना रकमा अदा केल्या जातील, दुष्काळी परिस्थितीमुळे बँकांनी कर्ज वितरणाला हात आखडता घेतला होता. पण आता त्यातून मार्ग निघत आहे. अर्थसाहाय्य मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे त्वरित परत केले जातील, असे ते म्हणाले.