राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक जयंत पाटील यांची शुक्रवारी अविरोध निवड करण्यात आली. नूतन संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये उपाध्यक्ष पदी विजयराव पाटील यांचीही अविरोध निवड करण्यात आली.
हेही वाचा- “२०२४ साठी आता भाजपाचं मिशन १५०!” देवेंद्र फडणवीस टार्गेट देत म्हणाले…
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत २१ संचालकांची बिनविरोध झाली होती. स्व. राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या या साखर कारखान्याचे चार विभाग कार्यरत असून गेली ३७ वर्षे या कारखान्याची धुरा माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्र्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हाती होती. माजी अध्यक्ष पी. आर . पाटील यांनी समर्थपणे कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले होते. आता युवा नेतृत्वाकडे कारखान्याची सूत्रे देण्याचे निश्चित करून तरूण नेतृत्वाला संधी देण्यासाठी आमदार पाटील यांनी सहकारातून निवृत्ती घेत कारखान्याची सूत्रे पुत्र प्रतिक पाटील यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा- बहिणीचा बॅनरवरील फोटो पाहिला अन् घरी परतला, सुषमा अंधारेंचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ सापडला!
जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली आज नूतन संचालक मंडळाची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक पार पडली. अध्यक्षपदासाठी संचालक कार्तिक पाटील यांनी प्रतिक पाटील यांचे नाव सुचविले तर या नावाला रघुनाथ जाधव यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी विजयराव पाटील यांचे नाव देवराज पाटील यांनी सुचविले तर बाळासाहेब पवार यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदी निवड होताच पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर असलेल्या स्व. राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर कार्यकर्त्यांनी फटाययाची आताषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.