सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयमाला गायकवाड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचेच शहाजी ऊर्फ बाबाराजे देशमुख यांची रविवारी दुपारी बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणातून बाहेर राहिलेल्या मोहिते-पाटील गटाने पुन्हा सत्तेत वाटा घेऊन वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून आले.
नूतन अध्यक्षा जयमाला गायकवाड या पूर्वी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपद सांभाळत होत्या. त्यांना आता बढती मिळाली. त्यांच्या रूपाने सांगोला तालुक्याला प्रथमच जिल्हा परिषदेचे अध्यक्षद मिळाले आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे यांच्या त्या भगिनी आहेत.
नूतन उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख हे माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथून जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व करतात. मोहिते-पाटील गटाचे समजले जाणारे देशमुख यांना उपाध्यक्षपद मिळाल्याने जि. प. मध्ये मोहिते-पाटील गटासाठी पाच वर्षांंचा वनवास संपून पुन्हा ‘अच्छे दिन’ आले आहेत. जि. प. मध्ये सत्तेची सूत्रे मोहिते-पाटील गटाकडून अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू संजय शिंदे यांच्याकडे गेली होती. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाचे बाबाराजे देशमुख यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळूनसुध्दा त्यांच्या विरोधात मावळत्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी व इतर पदाधिकाऱ्यांसह मोहिते-पाटील विरोधकांनी बंडखोरी करून त्यांचा पराभव घडवून आणला होता. परंतु आता बदलल्या राजकीय समीकरणामुळे बाबाराजे देशमुख यांच्या पराभवाची भरपाई म्हणून त्यांना सन्मानाने उपाध्यक्षपद बहाल करण्यास पक्षश्रेष्ठींना भाग पडले. यात मोहिते-पाटील गटाने आक्रमक पवित्रा घेत पूर्वी झालेल्या अवमानाचा बदला व्याजासकट घेतल्याचे दिसून आले.
यंदा जि. प. अध्यक्षपद खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने त्यावर जयमाला गायकवाड यांच्यासह सीमा पाटील (मोहोळ), सुकेशिनी देशमुख (पंढरपूर) व ज्योती मरतडे (उत्तर सोलापूर) आदींनी दावा सांगितला होता. तर अध्यक्षपद महिलेकडे जाणार असल्यामुळे उपाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत जोरदार चुरस होती. पवार गटाचे मावळते उपाध्यक्ष सुभाष गुळवे (करमाळा), शिंदे गटाचे मावळते समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे (माढा) तसेच मोहिते-पाटील गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील व बाबाराजे देशमुख (माळशिरस) यांची नावे चर्चेत होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा तिढा सोडविण्यासाठी तीन दिवसांपूर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली असता तिढा कायम राहिला होता. तर इकडे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत सन्मानाने सत्तेत भागीदारी मिळण्यासाठी मोहिते-पाटील गटाने ताकद पणाला लावली होती. त्यामुळे अखेर पवार गटाला मोहिते-पाटील गटाबरोबर तडजोड करावी लागली.
पक्षश्रेष्ठींनी ठरल्याप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडलेल्या उमेदवारांच्या नावांचा बंद लखोटा पक्ष निरीक्षक प्रदीप गारटकर यांच्याकडे दिला. गारटकर यांनी सकाळी जि. प. अध्यक्षांच्या यशवंतनगरातील बंगल्यात पक्षाच्या सर्व जि. प. सदस्यांच्या बैठकीत बंद लखोटा फोडला. यात जयमाला गायकवाड व बाबाराजे देशमुख यांची नावे जाहीर झाली. यावेळी माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यासह राष्ट्रवादीपासून दुरावलेले पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, करमाळ्याच्या आमदार श्यामल बागल, आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील (मोहोळ), माजी जि. प. अध्यक्ष बळीराम साठे (उत्तर सोलापूर) आदी उपस्थित होते. गेली पाच वर्षे जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणाची सूत्रे ताब्यात ठेवणारे आमदार शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे या बैठकीकडे फिरकले नाहीत. जि. प. सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली.
अध्यक्षपदी विमल पाटील; उपाध्यक्षपदी शशिकांत खोत
प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवारी बिनविरोध होऊन विमल पाटील यांची वर्णी लागली. तर उपाध्यक्षपदी शशिकांत खोत यांची निवड झाली. निवडीनंतर पाटील-खोत समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सदस्यांची बठक िशगणापूर येथील विद्यानिकेतन प्रशालेमध्ये प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभागृहात काँग्रेसचे वर्चस्व असल्याने काँग्रेसचे सदस्यच पदाधिकारी होणार हे स्पष्ट होते. पण कोणाला संधी मिळणार याचे कुतूहल निर्माण झाले होते. अखेर वरीलप्रमाणे निवडी बिनविरोध पार पडल्या पाटील या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या समर्थक असून त्या सांगरूळ मतदार संघातून निवडून आल्या आहेत. खोत हे गोकुळ शिरगाव मतदार संघातून विजयी झाले असून गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचे समर्थक आहेत. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मावळते अध्यक्ष उमेश आपटे व उपाध्यक्ष िहदुराव चौगुले यांनी केला.
अध्यक्षपदी माणिकराव सोनवलकर तर उपाध्यक्षपदी रवी साळुंखे बिनविरोध
सातारा, वार्ताहर
सातारा जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी माणिकराव सोनवलकर, तर उपाध्यक्षपदी सातारा विकास आघाडीचे रवी साळुंखे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. उपाध्यक्षपदाचा शब्द देऊन तो न पाळल्याच्या नाराजीमुळे अमित कदम यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा अध्यक्षा माने यांच्याकडे सुपूर्द केला. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्वविाद सत्ता असल्याने निवडी बिनविरोध होणार होत्या.
गेले दोन दिवस अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी चर्चा, खलबते, राजकीय डावपेच सुरू होते. खा. उदयनराजे भोसले यांनी आपल्याला जिल्ह्याच्या राजकारणात डावले जाते, अन्याय केला जातो याचा रोष व्यक्त केला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपण राजकीय भूकंप करणार असे जाहीर केले होते. मात्र त्या नंतर पक्षाच्या बठकीत त्यांच्या वर अन्याय होणार नाही असा शब्द दिला गेला. तरीही आज सकाळपासून डावपेचाचे राजकारण सुरू होते. मात्र अंतिमक्षणी दोन जागांसाठी दोन अर्ज राहिले आणि सोनवलकर तसेच साळुंखे यांना या अध्यक्षउपाध्यक्ष जाहीर करण्यात आले.
येत्या ४ तारखेला सभापती निवडी होणार आहेत. त्यातही खासदार गट सक्रिय रहाणार आहे. आजपर्यंत खासदार गटाला जिल्हा मध्यवर्ती बँक, रयत शिक्षणसंस्था तसेच जिल्हा राजकारणात गृहित धरले जात होते. त्यांना अंतिमक्षणी कात्रजचा घाट दाखवला जात होता. मात्र यावेळी खासदार गटाने आक्रमक पवित्रा घेतला. खा. भोसले यांनी ठाम भूमिका साळुंखे यांच्या बाबत घेतली त्यामुळे  साळुंखे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली.
दरम्यान या पदासाठी अमित कदम यांनाही शब्द देण्यात आला होता मात्र त्यांना अर्ज काढून घेण्यास सांगितल्यावर, त्यांनी पक्षात लोकशाही नाही, पक्षस्थापनेपासून आम्ही काम करत आहोत मात्र आमच्या कामाची कदर नाही, शब्द दिला जातो पण पाळला जात नाही असे सांगून सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाध्यक्ष माने यांच्याकडे तो सुपूर्द केला आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीनंतर साळुंखे समर्थकांनी जल्लोष केला.
जतच्या रेशमाक्का होर्तीकर अध्यक्षपदी
वार्ताहर, सांगली
    राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीमध्ये बहुमताच्या जोरावर राजकीय निरीक्षकांचे अंदाज धुळीला मिळवित अध्यक्षपदी जतच्या रेशमाक्का होर्तीकर यांना संधी दिली. आबांच्या मतदारसंघातील प्रबळ दावेदार असताना त्यांना डावलत  भाजपाच्या वाटेवर असणाऱ्या विलासराव जगताप यांना रोखण्यासाठी जत तालुक्याला अध्यक्षपदाची संधी देत वाळव्याच्या िलबाजी पाटील यांना उपाध्यक्ष करून नेत्यांनी प्रादेशिक समतोल साधला आहे.
    जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ अपक्ष २ आणि जनसुराज्य शक्तीचा एक सदस्यासह ३६ असून काँग्रेसचे  दोन अपक्षांसह २६ आहे. जतच्या रेशमाक्का होर्तीकर यांनी सभापतिपदासाठी आग्रह धरला होता. मात्र तासगाव तालुक्यातून मणेराजुरीच्या योजनाताई िशदे आणि सावळजच्या कल्पना सावंत यानी अध्यक्षपदासाठी जोरदार राजकीय शक्ती लावली होती. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दोघींपकी एकीला संधी दिली तर दुसरी नाराज होणार हे अपेक्षित होते. त्यामुळे या दोघीना टाळून जतच्या होर्तीकर यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली.
    राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या ९ सदस्यांचे नेते महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेमध्ये सामील झाल्याने बहुमतात असणाऱ्या राष्ट्रवादीची पदाधिकारी निवडीमध्ये कोंडी होईल हे गृहित धरून काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, सत्तेमध्ये उपाध्यक्षपदांसह दोन समित्या मिळत असतील तर आघाडी करावी असा सूर काँग्रेसच्या शनिवारी झालेल्या बठकीत सदस्यांनी व्यक्त केला होता. काँग्रेसच्या या मागणीकडे आणि न मागता देऊ केलेली मदत नाकारून राष्ट्रवादीने श्रीमती होर्तीकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करून आपणास काँग्रेसच्या मदतीची गरज नसल्याचे अप्रत्यक्ष सुचविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा