आगामी निवडणुकींसाठी महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, गजानन किर्तीकर हे उद्या मंगळवारी माझ्याशी चर्चा करणार आहेत. आमच्या पक्षाला लोकसभेच्या चार, विधानसभेच्या ३५, राज्यसभेची एक जागा तसेच उपमुख्यमंत्री पद मिळावे यासाठी मी आग्रही आहे. आरपीआयशिवाय युतीला सत्ता मिळविणे कठीण असल्याने आमच्या मागणीचा विचार त्यांना करावा लागेल, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.
यापूर्वी आमच्या पक्षाला पडणाऱ्या जागा दिल्या जात होत्या. यापुढे अशा जागा घेतल्या जाणार नाहीत. उलट भाजपा-शिवसेनेला दिलेल्या जागांवर आमच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारीही पार पाडावी लागेल, असेही ते म्हणाले. युतीमध्ये मनसेचा समावेश होण्यासाठी पूर्वी आपला विरोध होता. मात्र आता तो मावळला आहे, असा उल्लेख करून आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच टाळीची अपेक्षा केलेली आहे. आता मनसेने ग्रीन सिग्नल देण्याची गरज आहे. उद्धव व राज दोघांनीही रेड सिग्नल दिला तर काहीच उपयोग होणार नाही. शिवसेना-भाजपा व आरपीआय महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये १५५ मतदारसंघांमध्ये विजय प्राप्त होऊन सत्ता निश्चितपणे मिळेल. मनसे महायुतीत सामाविल्यामुळे आणखी ३० जागा वाढतील.     
आरपीआय आठवले गटाचे सोशल इंजिनिअरींगकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली देऊन आठवले म्हणाले, आजच्या राजकारणात सोशल इंजिनिअरिंग, इकॉनॉमी इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग या तिन्हीचीही गरज आहे. त्यादृष्टीने आमच्या पक्षाने आदिवासी, मासागवर्गीय, इतर मागासवर्गीय, ब्राह्मण, अल्पसंख्याक अशा विविध आघाडय़ांची स्थापना करून पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप देण्याचा प्रयत्न चालविला आहे.     
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूंची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करून आठवले यांनी आसाराम बापूंचे कृत्य निंदनिय व चिड आणणार असल्याचे नमूद केले. आसाराम बापूंची डीएनए तपासणी झाली पाहिजे. त्यांच्या भक्तांनी बापूंची साथ सोडून आमच्या सोबत आले पाहिजे. गौतम बुध्द, गुरूनानक यांच्याप्रमाणे माझ्यावर झालेले आरोपही खोटे आहेत, असे सांगून आसारामबापू स्वतला वाचविण्याचा प्रयत्न करीत असले तरी ते यातून वाचणार नाहीत. लैंगिक अत्याचारात यापूर्वी अनेक महाराज सापडले होते. आता त्यामध्ये बापूंचा समावेश झाला आहे. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रयत्नाने तयार झालेला जादूटोणा कायदा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा