औरंगाबादसह मराठवाडय़ात शिवसेनेच्या जडणघडणीत पहिल्या कालखंडात बिनीचे शिलेदार अशी ओळख असणारे माजी खासदार मोरेश्वर दीनानाथ सावे यांचे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. १९८८ ते १९९६ अशी त्यांची राजकीय कारकीर्द खळबळजनक होती. शिवसेनेच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग होता. बाबरी मशीद प्रकरणातही ते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सहआरोपी होते. हिंदुत्ववादी विचारसरणीने कार्यरत असणारे सावे यांचा उद्योगक्षेत्रात मोठा लौकिक होता. सवेरा उद्योगसमूहाचे ते अध्यक्ष होते. चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर या संघटनेचेही ते अध्यक्ष होते.
‘मशाल’ या चिन्हावर पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढविणारे सावे नंतर शिवसेनेत गेले. राजकारणातील चढउतार पाहात औरंगाबादचे ते महापौरही झाले. १९८९-९० अशी त्यांची महापौरपदाची कारकीर्द होती. यानंतर १९८९ ते १९९६ या कालावधीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांनी भूमिगत राहून काम केले होते. हैदराबाद येथून त्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे सावे नंतरच्या काळात शिवसेनेलाही अप्रिय झाले होते. शिस्तीचा कडवा शिवसैनिक अशी त्यांची अनेक वर्षे ओळख होती. यातील शिस्तीचा भाग आजही त्यांच्या दालनात जाणाऱ्या व्यक्तींना पाहावयास मिळत असे. त्यांच्याकडील सर्व दस्तऐवज एवढय़ा पद्धतशीरपणे ठेवलेले असत, की ते डोळे झाकूनही कोणत्या बाजूला कोणती गोष्ट ठेवली आहे, हे सांगत असत. शहरातील बहुतांश सार्वजनिक कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावत. ‘नादब्रह्म’ या सांस्कृतिक संघटनेचे ते अध्यक्ष होते. वेगवेगळय़ा संसदीय समित्यांवर त्यांनी प्रतिनिधित्व केले. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनाही ते प्रोत्साहन देत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. भाजपचे आमदार अतुल सावे यांचे ते वडील होत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा