लोकसभा निवडणुकीत केवळ मोदी लाटेमुळे राज्यात शिवसेनेचे तब्बल १९ खासदार निवडून आले असून यात स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्तृत्व नाही. लोकसभेत निर्विवाद बहुमतामुळे भाजप, शिवसेनेची घुसमट करीत आहे. एरव्ही पाकिस्तानी संघाला मुंबईसह भारतात कोठेही क्रिकेट खेळू न देण्याचे इशारे देणाऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना नवी दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याप्रसंगी पाकच्या पंतप्रधानांसमवेत बसावे लागले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आज कदाचित हयात असते तर शिवसेनेची ही फरपट झाली असती काय, त्यांना हे सर्व पटले असते काय, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित करीत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी दुपारी हेरिटेज गार्डनमध्ये आयोजिलेल्या निर्धार मेळाव्यात पवार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, पक्षाचे निरीक्षक जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण आदींची उपस्थिती होती. पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
केंद्रात मंत्रिमंडळात शिवसेनेला अवजड उद्योग खाते देण्यात आले. हे ‘अवघड’ खाते शिवसेनेने प्रथम चालवून दाखवावे, असे आव्हान देताना पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा चौफेर मारा केला. ठाकरे यांना शेती प्रश्न काय आहेत, हेच माहीत नाही. खरोखर शेतकऱ्यांवर प्रेम असते तर त्यांनी स्वत: शेती करायला हवी होती, असा टोला त्यांनी मारला. लोकसभा निवडणुकीत भाजपने समाज माध्यमांचा पुरेपूर वापर करून ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणून मोठी जाहिरातबाजी केली. परंतु सत्तेवर येताच नरेंद्र मोदी सरकारने महागाईचा भडका उडविला. ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणजे ‘महागाई कमी करू’ असे बोललो नव्हतो, असा साळसूदपणा भाजपने घेतला. सामान्यांच्या घरात बंद पडलेली चूल पेटवायची भाषा करून मोदींनी सत्ता घेतली आणि प्रत्यक्षात मात्र उद्योगपतींचेच भले केले, असा आरोप पवार यांनी केला. नरेंद्र मोदींचा प्रभाव आता ओसरला असून आगामी विधानसभा निवडणुकीत तो प्रभाव दिसणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, आघाडी सरकारवर टीका करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम स्वत:च्या ताब्यातील मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर नजर फिरवावी, असे सुनावले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल, आमदार लक्ष्मण ढोबळे, पक्षाच्या महिला शहराध्यक्षा अरुणा वर्मा आदींची भाषणे झाली. यावेळी सोलापुरात विधानसभेच्या तीन जागांपैकी किमान एक जागा राष्ट्रवादीला सोडण्यात यावी, या मागणीचे समर्थन अजित पवार व सुनील तटकरे यांनी केले. या मेळाव्यास माजी आमदार युन्नूसभाई शेख, नरसिंग मेंगजी, महादेव पाटील, उपमहापौर हारून सय्यद, माजी महापौर मनोहर सपाटे, पक्षाचे माजी शहराध्यक्ष शंकर पाटील, जनार्दन कारमपुरी, सुभाष पाटणकर हे उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन दिनेश शिंदे यांनी केले. या मेळाव्यास कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा