पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, उसाला एफआरपीप्रमाणे भाव द्यावा, कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी करीत शिवसेनेच्या वतीने माजलगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजपबरोबर शिवसेना सत्तेत सहभागी असली, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसनिक रस्त्यावर उतरणार असून, सरकारने कर्जमुक्ती न केल्यास प्रसंगी वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिला. विधिमंडळात दोन्ही काँग्रेस कर्जमुक्तीसाठी आक्रमक झाल्या असताना शिवसेनेनेही आंदोलन सुरू केले आहे.
सेनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने सोमवारी माजलगावच्या शिवाजी चौकात जिल्हाप्रमुख जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते डॉ. उद्धव नाईकनवरे, तालुकाप्रमुख सतीश सोळंके यांच्यासह पदाधिकारी-शिवसनिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. बँकांकडूनही कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शिवसनिकांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाभर आंदोलन करण्यात येणार आहे. आठ दिवसांत सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन जगताप यांनी केले.
युती सरकारविरुद्ध सेनेचे माजलगावला रास्ता रोको
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, उसाला एफआरपीप्रमाणे भाव द्यावा, कर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
First published on: 21-07-2015 at 01:51 IST
TOPICSरास्ता रोको
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sena rasta roko