लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : सांगलीच्या जागेबाबत ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असून ठाकरे सेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना तातडीने मुंबईला पाचारण करण्यात आल्याने पेच लवकरच सुटण्याची चिन्हे दिसत आहेत.
महाविकास आघाडीतून शिवसेनेचे पाटील हेच उमेदवार असतील असे खासदार संजय राउत यांनी सांगली दौर्यात आत्मविश्वासाने सांगितले. मात्र, पाटील यांनाच मातोश्रीवरून तातडीने बोलावणे आल्याने ते खासदार राउत यांच्यासोबतच मुंबईला रवाना झाल्याने उलटसुलट चर्चा आता सुरू झाली आहे.
आणखी वाचा-“कुवतीपेक्षा जास्त झेपत नसेल तर…”, खासदार श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला असून दोन दिवसात सांगलीचा पेच सुटेल असा विश्वास दिला आहे तर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी दोन दिवसात गोड बातमी येईल असे सांगत उमेदवारी मिळण्याची आशा अद्याप असल्याचे सूचक विधान केले आहे.