सोलापूर : सोलापुरी चादर आणि टॉवेल उत्पादनासाठी सोलापूरचा वस्त्रोद्योग लौकिक प्राप्त असला, तरी येथील सोलापुरी चादर उत्पादनातील बनावटगिरी वाढली आहे. त्यामुळे मूळ अस्सल सोलापुरी चादरीचे उत्पादन कमालीचे घटले आहे. या पार्श्वभूमीवर येथील संकटग्रस्त वस्त्रोद्योग सावरण्यासाठी सोलापुरात टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाला प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालक सचिव संजय सेठी यांनी दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर जिल्ह्यात डाळिंब व केळी फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यावरील प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव पाठवावेत, अशाही सूचना सेठी यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय विभागांच्या कामांची आढावा बैठक सेठी यांनी घेतली. त्या वेळी ते बोलत होते. सर्व शासकीय विभागांचे मंत्रालय स्तरावर असलेल्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर आदी उपस्थित होते.

सोलापूर पूर्वापार परंपरेने वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. सोलापुरी चादरी, टॉवेल, बेडशीट, शालेय गणवेश इत्यादी उत्पादनांचा विचार करता वस्त्रोद्योगाला चालना मिळावी म्हणून टेक्स्टाईल पार्क उभारण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार करून पाठवावा. शासन स्तरावर पाठपुरावा करून टेक्स्टाईल पार्क मंजूर करवून घेऊ, अशी ग्वाही सेठी यांनी या बैठकीत दिली. याशिवाय सोलापूर जिल्हा डाळिंब, केळी, द्राक्षे उत्पादनात अग्रेसर असून, विशेषतः केळी निर्यातीत सोलापूर राज्यात प्रथमस्थानी आहे. त्यामुळे डाळिंब व केळी फळांवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा. त्यासाठी मंत्रालय स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही सेठी यांनी सांगितले. गृह विभागासह परिवहन व बंदरे विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव संजय सेठी यांनी होटगी रस्त्यावरील जुन्या सोलापूर विमानतळाला भेट देऊन पाहणी केली. प्रलंबित विमानसेवा सुरू होण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि विमानतळ प्राधिकरणाकडून मांडण्यात आल्या.