लोकसत्ता प्रतिनिधी

रत्नागिरी : रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी बांधलेल्या ऐतिहासिक पतितपावन मंदिरात प्रदीप चंद्रकांत उर्फ बाबा परुळेकर यांनी ज्येष्ठ भजनी बुवांना मंदिरात प्रवेश नाकारून भजनास अटकाव केल्या प्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. मंदिराचे विश्वस्त असलेल्या बाबा परुळेकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी संतप्त झालेल्या भजनी बुवांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.

पतितपावन मंदिरात बहुजन समाजातर्फे २६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याविषयी मंदिर व्यवस्थापनाला २५ मार्च २०२५ रोजी पत्राद्वारे कळवण्यात आले होते. त्यानुसार दि. २७ मार्च २०२५ रोजी शिवरात्रीला सायंकाळी ७ ते ८ या वेळेत भजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. मात्र दि. २६ एप्रिल रोजी भजनी बुवा सुरेंद्र यशवंत घुडे, संजय धाकू मेस्त्री, कौस्तुभ नागवेकर, सुदेश भरत नागवेकर, मनोज भाटकर, जयवंत बोरकर आणि इतर ज्येष्ठ भजनी बुवांनी हार्मोनियम, टाळ, पखवाज, मृदंग यासाहित्यासह मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी बाबा परुळेकर यांनी त्यांना अटकाव करत “हे मंदिर आमचे आहे, तुम्ही येथे भजन करू शकत नाही,” असे सांगत त्यांनी भजनी बुवांना मंदिरात प्रवेश नाकारला. असे भजनी बुवांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या घटनेने भजनी बुवांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, त्यांनी बाबा परुळेकर यांच्यावर मानहानीचा आरोप केला आहे. ८६ वर्षीय जयवंत बुवा बोरकर यांनी सांगितले, “माझ्या ६३ वर्षांच्या भजन सेवेत मंदिरातून भजनी बुवांना बाहेर जाण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे. असे कधीच कुठे ऐकले नव्हते, ते आज अनुभवायला मिळाले.” भजनी बुवांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बाबा परुळेकर यांनी बहुजन समाजातील ज्येष्ठांना मंदिरात प्रवेश नाकारून त्यांचा अपमान केल्याने भजनी बुवांनी बाबा परुळेकर यांच्याविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी बाबा परुळेकर यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात येते, याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.