राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी धोरण तयार केले आहे. लवकरच ते मंत्रिमंडळासमोर मांडले जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
अलिबाग नगर परिषदेने उभारलेल्या ज्येष्ठ नागरिक भवनाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा सुरक्षा शहा, अलिबाग नगर परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी नार्वेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ल. नि. नातू आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
सरकारला ज्येष्ठ नागरिकांसाठी बरेच काही करायचे आहे, परंतु सरकारला मर्यादा पडतात. त्यामुळे आपली कामे करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी संघटित होऊन ज्येष्ठांसाठी काही कामे केली पाहिजेत, असे चंद्रकांत पाटील आपल्या भाषणात म्हणाले.
राज्यातील प्रत्येक शहरात, गावात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र उभारण्याचा प्रयत्न तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी केला पाहिजे. असे विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी सरकार मदत करेल, असे सहकारमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
येत्या चार महिन्यांत अलिबाग शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. लवकरच संपूर्ण शहरात वायफाय सुविधा दिली जाईल. शहरातील सार्वजनिक वाचनालय अद्ययावत केले जाईल. त्यासाठी पंचवीस लाख रुपये निधी दिला जाईल. ज्येष्ठांचे आयुष्य वाढेल अशा सुविधा अलिबाग शहरात निर्माण केल्या जातील, असे आमदार जयंत पाटील यांनी या वेळी जाहीर केले.
अलिबाग शहरात चटईक्षेत्र निर्देशांक वाढवून तो चार करण्यात यावा. शहरात पिण्याच्या पाण्यासाठी अमृत योजना लागू करावी, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली. ल. नि. नातू यांनी प्रास्ताविक केले.

Story img Loader