काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील इतर नेतेही भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रात होत आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा भाजपाची ऑफर मिळाली, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर येथे सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंचे हे विधान समोर आल्यामुळे याचा राजकीय अर्थ काढला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले सुशील कुमार शिंदे?

सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन सोहळ्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. “भाजपाचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपामध्ये या म्हणून सांगत होते. पण ते कसं शक्य आहे. ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो, जिथे आमचे बालपण गेले, जिथे आम्ही वाढलो. आता मी ८३ वर्षांचा झालो, आता कसं दुसऱ्याशी घरोबा करणार? हे शक्य नाही. प्रणितीबद्दल तुम्हाला माहितीच आहे, ती पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही.”

हे वाचा >> “एक वर्तुळ पूर्ण झालं, ज्या माणसामुळे…”, नार्वेकरांच्या निकालावरून शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका

कार्यकर्त्यांशी बोलत असताना शिंदे यांनी हा गौप्यस्फोट केला. भाजपाकडून मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा ऑफर दिली गेली. माझा दोन वेळा पराभव होऊनही मला ऑफर दिली जाते. माझे संपुर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी हा निर्णय कसा काय घेऊ शकतो, असेही ते म्हणाले.

सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना लोकसभेची उमेदवार म्हणून पुढे केले जात असताना सोलापूरमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुशीलकुमार शिंदेच्या दाव्यानंतर भाजपाकडूनही त्यावर प्रतिक्रिया दिली जात आहे. आमदार नितेश राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, प्रणिती शिंदे २०२४ साली निवडून येणार नाही, ही खात्री असल्यामुळेच कदाचित ते असे विधान करत असावेत. जेणेकरून प्रणिती शिंदेंचा भाजपामध्ये प्रवेश होण्याचा मार्ग सोपा होईल.

“उबाठाची भारी आयडीया..”, संदीप देशपांडे मनसे कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हणाले; “खुले न्यायालय…”

आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, इतर पक्षातील चांगली लोक भाजपामध्ये यावीत, अशी भूमिका घेऊन भाजपाचे काही लोक काम करत आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये आता काही होऊ शकत नाही. नेतृत्व कुचकामी असल्यामुळे ते देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सर्वमान्य झाल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी स्वीकारले आहे. मुरली देवरा यांचे सुपुत्र मिलिंद देवरा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आता काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशाची मालिका सुरू होईल. तसेच काँग्रेसमधील नव्या नेत्यांना मोदींचे एक आकर्षन आहे. मोदींच्या कामावर प्रभावित असलेले नेते नजीकच्या काळात भाजपामध्ये येत राहतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior congress leader sushil kumar shindes big claim about joining bjp offer also named praniti shinde kvg